राज्य शासनाचे ‘मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स’ धोरण

सातारा : राज्यातील शाश्वत शेती आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी कृत्रिम प्लास्टिक फुलांच्या वापरावर निर्बंध आणण्याच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी विधानभवन येथे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
मंत्री व आमदारांनी केलेल्या सुचनांचा विचार करून राज्य शासन कृत्रिम फुलांबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा विचार करणार असून ‘मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स’ धोरण अंमलात आणण्यासाठी सकारात्मक असल्याचे ना. पंकजा मुंडे यांनी सांगितले.
बैठकीला रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भरतशेठ गोगावले, आ. महेश शिंदे, आ. सुनील शेळके, आ. अमोल महाडिक, आ. रोहित पाटील, आ. विश्वजीत कदम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री व आमदारांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे राज्यातील फूल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याबाबत चिंता व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, राज्यात कृत्रिम फुलांच्या बाबतीत उत्पादन, आयात, विक्री व नियमन आणण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे. कृषी फुलांचा वापर वाढवणार्या शासकीय व सार्वजनिक उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. कृषी फूल उत्पादक शेतकर्यांसाठी अनुदान, प्रशिक्षण आणि हरितगृह तयार करण्यासाठी सवलती द्याव्यात.
पर्यावरण व आरोग्य विषयक अभ्यास समितीमार्फत कृत्रिम फुलांचे दुष्परिणाम यावर सखोल शास्त्रीय अहवाल तयार करावा. ‘मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स’ अशा अभियानाच्या माध्यमातून कृषी फुलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, शेतीसाठी अनुकूल धोरणे राबवणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. कृत्रिम फुलांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले म्हणाले, हरितगृह शेती, ठिबक सिंचन, नियंत्रित तापमान या आधुनिक पद्धतींचा वापर करून शेतकरी फुलांची निर्यातक्षम उत्पादन क्षमता वाढवत आहेत. यावेळी कृत्रिम फुलांचा अनियंत्रित वापर हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला मारक असल्याचे त्यांनी सांगितले.
रसायने मानवी आरोग्यालाही धोकादायक
विशेषत: झेंडू, गुलाब, जास्वंद यासारख्या पारंपरिक फुलांच्या मागणीत घट झाली आहे. राज्यातील शेतकरी गुलाब, झेंडू, जास्वंद, ट्युलिप, कार्नेशन, रजनीगंधा इत्यादी निर्यातक्षम फुलांची उत्पादन क्षमता विकसित करत आहेत. हरितगृह शेती करणार्या शेतकर्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
कृत्रिम फुलांचे उत्पादन प्रामुख्याने न विघटनशील घटकांपासून म्हणजे पॉलीस्टर, नायलॉन, प्लास्टिक आणि सिंथेटिक रंगांपासून होते. त्यामुळे त्याचा पर्यावरणावर दीर्घकाळ विपरीत परिणाम होतो. जलप्रदूषण आणि मातीच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. अशा फुलांवर वापरली जाणारी रसायने मानवी आरोग्यालाही धोका निर्माण करत आहेत, याकडे मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी लक्ष वेधले.




