Pankaja Munde – राज्यातील अश्व क्षेत्राच्या परिसंस्थेला उभारी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थांशी सहकार्य करण्यास आणि विद्यापीठांशी जोडले जाण्यास तत्पर आहे. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन लवकरच नामवंत संस्थांसोबत सामंजस्य करार करेल, अशी घोषणा राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या द इक्वाईन कलेक्टिव्ह संस्थेच्या वतीने आयोजित द इक्वेस्ट्रियन फोरम २०२६ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, संस्थापक गायत्री कराड, डॉ. आदिती कराड आणि अश्व क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या की, अश्व क्षेत्रात केवळ क्रीडाच नव्हे, तर ग्रामीण विकास, पर्यावरण आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता आहे. या क्षेत्रासाठी सामूहिक दृष्टिकोन स्वीकारणे काळाची गरज आहे. यावेळी गायत्री कराड यांनी जागतिक अश्व परिसंस्थेचे महत्त्व विशद करताना सांगितले की, भारतात हे क्षेत्र अद्याप असंघटित आहे. प्रशिक्षणाचा अभाव दूर करून कौशल्य विकास आणि दीर्घकालीन करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी द इक्वेस्ट्रियन फोरम एक सक्षम व्यासपीठ म्हणून काम करेल. मंत्री जयकुमार रावल यांनी अश्व पर्यटनावर भर दिला तर डॉ. राहुल कराड यांनी शिक्षण, प्राणी कल्याण आणि क्रीडा विज्ञान यांची सांगड घालून ही परिसंस्था बळकट करण्याचा मानस व्यक्त केला. या परिषदेमुळे भारतातील अश्व पैदास आणि प्रशिक्षणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.