राज्य मंडळाची बेवसाइट क्रॅश; पालक संतप्त

पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केला. मात्र दिवसभर सर्व्हर डाऊन झाल्याने वेबसाइट क्रॅश झाल्या. यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहताच आले नाहीत. विद्यार्थी, पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
यामुळे निकालाचे काम चांगले करुन तांत्रिक अडचणीमुळे निकालाला मात्र गालबोट लागले आहे. तसेच विद्यार्थी, पालकांच्या आनंदावर विरजनच पडले. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सकाळी 11 वाजता राज्याचा दहावीचा निकाल जाहीर केला.
विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल वेबसाइटवर पाहता येणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. राज्य मंडळाकडून निकाल पाहण्यासाठी वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तांत्रिक अडचणींमुळे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना निकालच पाहता आले नाहीत.
विद्यार्थी, पालकांनी मोबाइलवर निकाल पाहता येत नसल्याने अखेर सायबर कॅफेकडेही धाव घेतली. मात्र पदरी निराशाच आली. निकाल पाहता येत नसल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याकडून राज्य मंडळ, विभागीय मंडळ फोन करून विचारणा करण्याचा धडाकाच लावला होता. यामुळे अधिकारी, कर्मचारीही हैराण झाले होते. दरम्यान राज्य मंडळाकडून संकेतस्थळाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.





