राज्याला अतिवृष्टीचा धोका; २६ जिल्हांना यलो अलर्ट; मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस

मुंबई/पुणे : राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून, काही भागांत जोरदार सरी पडत आहेत, तर काही भागांत पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान, राज्यातील २६ जिल्हांना यलो अलर्ट दिल्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले. आज वादळी वारे, विजा आणि मध्यम पर्जन्याची शक्यता आहे.
राज्यातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा स्थिर आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक महाराष्ट्रापासून तेलंगणा ओलांडून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत, समुद्रसपाटीपासून दीड किमी उंचीवर एक द्रोणिका रेषा जात आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम, तर काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील २४ तासांत कोकण- गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील एक ते दोन आणि विदर्भातील दोन ते तीन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ७ ते १० जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडेल. शेतकऱ्यांचे १० जूनपर्यंत शेत तयार नाही झाले, तर दि. १० ते १२ जूनदरम्यान शेत तयार करायला संधी मिळेल. राज्यात १३ ते १८ जून मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी ओढे नाले वाहतील, असा पाऊस पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. काही भागांत अतिवृष्टी देखील झाली आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, तसेच काही भागांत जास्त पाऊस पडल्यामुळे शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
१३ जून ते १८ जूनदरम्यान मुसळधार
पूर्व विदर्भ, पश्चिमी विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा सगळ्या विभागांमध्ये ७, ८, ९ जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे; पण त्यानंतर १३ जून ते १८ जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणजे ओढे नाले वाहतील, असा पाऊस पडण्याची शक्यता आहे.





