पुणे | राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (सोमवारी) जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९५.८१ टक्के लागला असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात १.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना १०० टक़्के गुण मिळाले आहेत.
दहावीच्या ७२ विषयांची आठ माध्यमांतून परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ६० हजार १५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ९५.८१ आहे.
नऊ विभागीय मंडळांमधून एकूण २५ हजार ७७० पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ३२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी १२ हजार ९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ५१.१६ आहे.
सर्व विभागीय मंडळांतून नियमित मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.२१ असून, मुलांची ९४.५६ टक्के आहे. म्हणजेच मुलींची पास होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ ने जास्त आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९९.०१ टक्के आहे,
तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९४.७३ टक्के आहे. एकूण १८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागील वर्षी राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा होता. त्यात यंदा १.९८ टक्क्यांनी वाढ होऊन ९५.८१ टक्के निकाल लागला.
जिल्ह्यांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल हा सर्वाधिक ९९.३५ टक्के, तर वर्धा जिल्ह्याचा सर्वात कमी ९२.०२ टक्के निकाल लागला आहे. परीक्षेस एकूण २५ हजार ८९४ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले.
त्यापैकी २० हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ आहे. ९,१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी ८ हजार ४६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण पास होण्याची टक्केवारी ९३.२५ आहे.
नियमित, पुनर्परीक्षार्थी व खासगी मिळून एकूण १६ लाख ११ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख २१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी १५ लाख १७ हजार ८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.८६ आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. या वेळी सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर आदी उपस्थित होते.
लातूरमधील १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
इयत्ता दहावीच्या परीक्षेत लातूर विभागातील सर्वाधिक १२३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त करत चमकदार कामगिरी केली आहे. छत्रपती संभाजीनगर- ३२, पुणे- १०, मुंबई- ८, अमरावती- ७, कोल्हापूर- ३, कोकण- ३, तर नागपूर विभागातील एका विद्यार्थ्याने १०० टक्के गुण मिळविले आहेत.
विभागनिहाय निकाल
पुणे – ९६.४४
नागपूर – ९४.७३
छत्रपती संभाजीनगर – ९५.१९
मुंबई – ९५.८३
कोल्हापूर – ९७.४५
अमरावती – ९५.५८
नाशिक – ९५.२८
लातूर – ९५.२७
कोकण – ९९.०१




