नेवासा शहरात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करा; शहर काँग्रेसची नगरपंचायतीकडे मागणी

नेवासा – नेवासा शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शहर काँग्रेसने तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी नगरपंचायतीकडे केली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात शहरातील अहिल्यानगरसारख्या प्रभागांमध्ये सात-आठ दिवसांतून केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, त्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.
नगरपंचायतीकडे विचारणा केल्यास, पाणी साठवणुकीसाठी आवश्यक क्षमतेची टाकी नसल्याने मुकिंदपूर ग्रामपंचायतीकडून पाणी घेऊन शहराच्या काही भागांना पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जाते. तसेच, वारंवार वीजखंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे कारण पुढे केले जाते. नागरिकांचे म्हणणे आहे की, नगरपंचायतीचे पाणी नियोजनच अपुरे आहे. पाणीपट्ट्यांचे बिल भरमसाठ आकारले जाते, पण पाणीपुरवठा होत नाही, अशी तक्रार आहे.
शहर काँग्रेसने नागरिकांच्या समस्यांची दखल घेत नगरपंचायतीला निवेदन देत टँकर सुरू करण्याची मागणी केली. तातडीने टँकर सुरू न केल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे, शहराध्यक्ष अंजुम पटेल, शेतकरी संघटनेचे त्र्यंबक भदगले, बसपाचे युवा नेते हरीश चक्रनारायण, स्वाभिमानी संघटनेचे गणपत मोरे, गुलाब पठाण, संजय होडगर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.





