युक्रेन रिकव्हरी कॉन्फरन्सला सुरुवात; झेलेन्सकी यांनी केले उर्जा नेटवर्कसाठी मदतीचे आवाहन

बर्लिन, (जर्मनी) – युक्रेनमधील उर्जा प्रकल्प दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले. या उर्जा प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी अल्पावधीची आणि फेरउभारणी करण्यासाठी दीर्घ मुदतीची मदत आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रशियाच्या हल्ल्यात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जर्मनीमध्ये युक्रेन रिकव्हरी कॉन्फरन्सला आजपासून सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अतिरिक्त मदतीची अपेक्षा झेलेन्सकी यांनी यावेळी केली. जर्मनीमध्ये होत असलेल्या युक्रेन रिकव्हरी कॉन्फरन्ससारखीच परिषद वर्षभरापुर्वी लंडनमध्येही झाली होती.
जर्मनीतील परिषदेला देशांतर्गत आणि स्तानिक राजकारण्यांपैकी २ हजार जण उपस्थित होते. युक्रेनमधील नुकसान भरून काढण्याचे उद्दिष्ट एकट्या सरकारला पेलवणारे नाही, हे लक्षात घेऊन खासगी उद्योगांच्या प्रतिनिधींनाही या परिषदेला सहभागी करून घेण्यात आले होते.
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील इतर उर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात युक्रेनच्या पॉवर ग्रीडचेही नुकसान झाल्यामुळे युक्रेनच्या मोठ्या भूभागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. देशाच्या बहुसंख्य भागात अंधार पसरला आहे. या प्रकल्पांच्या दुरुस्तीला प्राधान्य आवश्यक असल्याचे झेलेन्सकी यांनी यावेळी सांगितले. या आठवड्यात इटलीमध्ये होत असलेल्या जी-७ आणि स्वत्झर्लंडमध्ये होत असलेल्या युक्रेन शांतता परिषदेमध्येही युक्रेनच्या मदतीवर चर्चा होणार आहे.





