ST Strike: एसटी संप मिटण्याची शक्यता, बैठकीत सकारात्मक चर्चा

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरणाच्या मागणीसाठी काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आज बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून एसटी संप मिटण्याची शक्यता आहे. यावर उद्या सकाळी 10 वाजता विधानपरिषद सभापती बैठकीतून निघालेल्या तोडग्याबाबत सभागृहात माहिती देणार आहे.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या निर्देशानुसार एसटी संपाबाबत आमदारांची समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती स्थापन करुन आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या होत्या.
त्यानुसार एसटी संदर्भात आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, शेकापचे जयंत पाटील, प्रविण दरेकर शेखर चन्ने बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.





