‘जागा नाही’ म्हणताच एस.टी. कंडक्टरला बेदम मारहाण, शिरूर बसस्थानकातला धक्कादायक प्रकार

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एस.टी. आगारात २० जुलै रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. माजलगाव डेपोची स्लीपर कोच बस (क्रमांक: MH-09-FL-1020) पुण्याहून माजलगावला जात असताना शिरूर बसस्थानकात थांबली होती. यावेळी बस पूर्ण क्षमतेने भरलेली असताना एका प्रवाशाला सामानासह बसण्यासाठी जागा नसल्याचे वाहकाने सांगितले.
यावरून संतापलेल्या प्रवाशाने वाहकाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या झटापटीत वाहकाचे २१ हजार रुपये गहाळ झाले असून, शिरूर पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लक्ष्मण शिवलाल बैनाडे व चंदुलाल लक्ष्मण बैनाडे (रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात सुरेश किसनलाल बिजूले (वय ३५, व्यवसाय- नोकरी, रा. उमरा, ता. पाथरी, जि. परभणी) या एस.टी.महामंडळाच्या वाहकाने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस शिरूर आगारात थांबली असताना काही प्रवासी उतरले आणि नवीन प्रवासी चढले. बस पूर्ण भरल्यानंतर, लक्ष्मण शिवलाल बैनाडे आणि चंदुलाल लक्ष्मण बैनाडे (दोघेही रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यासह एक व्यक्ती मोठ्या झाडू आणि छत्र्या घेऊन बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती.
यावेळी सुरेश बिजूले यांनी त्यांना “बसमध्ये जागा नाही, दुसऱ्या बसने जा” असे सांगितले. यावरून संतापलेल्या लक्ष्मण बैनाडे याने “एस.टी. तुझ्या बापाची आहे का?” अशी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बिजूले यांना मारहाण सुरू केली. यानंतर चंदुलाल बैनाडे आणि एका अज्ञात व्यक्तीने बिजूले यांना बसमधून खाली उतरवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांना दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
या गोंधळात भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेले चालक बालाजी झगडे आणि इतर कर्मचाऱ्यांनाही आरोपींनी शिवीगाळ आणि मारहाण केली. झटापटीदरम्यान बिजूले यांच्या खिशातील २१ हजार रुपये गहाळ झाले. या घटनेनंतर बिजूले आणि झगडे यांनी शिरूर आगार व्यवस्थापकांना माहिती दिली. व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार, बिजूले यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शिरूर पोलिसांनी लक्ष्मण शिवलाल बैनाडे, चंदुलाल लक्ष्मण बैनाडे आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




