Pune : भटक्या श्वानांमुळे पुणेकर हैराण

पुणे – भटक्या कुत्र्यांच्या (श्वान) पाठलागाने आणि चाव्याने पुणेकर हैराण झाले आहेत. गेल्या पाच महिन्यांत तब्बल १२ हजार ३१२ जणांना कुत्र्यांनी एकतर बोचकारले आहे किंवा हल्ला करून चावा घेतला आहे. दरवर्षी २० ते २५ हजार अशा घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
मनुष्यवस्ती कमी असलेला भाग, कॅनाॅल रस्ता, कचरा साचलेल्या ठिकाणांसह रस्ते, पदपथावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. विशेषत: कचरा साचलेल्या ठिकाणी अन्नाच्या शोधात येणाऱ्या कुत्र्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे रस्ते, पदपथ आणि चौकांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असतात. यामुळे रस्त्याने दुचाकीवरून जाणारे चालक, पादचारी व्यक्तींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यात रात्री मनुष्यवस्ती कमी असलेल्या भागात भटक्या कुत्र्यांची दहशत अधिक असते.
जानेवारीत २,७९२ प्रकार
दुचाकीस्वार, पादचारी हे भटक्या कुत्र्यांचे ठरलेले लक्ष्य असते. दुचाकीचा पाठलाग केल्याने चालक घाबरतो आणि अपघात होतात. काही श्वानांनी चालकांच्या पायाला चावा घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत, तसेच घर, सोसायटी परिसरात खेळणाऱ्या मुलांवरही हल्ले झालेले आहेत. मागील पाच महिन्यांतील प्रत्येक महिन्यामध्ये अडीच ते तीन हजार जणांना कुत्र्याने एकतर बोचकारले आहे किंवा चावा घेतला आहे. त्यामध्ये जानेवारी महिन्यात सर्वाधिक २ हजार ७९२ घटनांची नोंद झाली आहे.
कशी होईल दहशत कमी?
– लसीकरण, नसबंदी, निर्जंतुकीकरण
– भटक्या कुत्र्यांचे स्पाॅट शोधून उपाययोजना
– रस्ता कचरामुक्त ठेवणे
– प्रशासनाच्या ठोस उपाययोजनांची गरज
– नागरिकांमध्ये जनजागृती
वाढते श्वान हल्ले
२०२२ : १६ हजार ५६९
२०२३ : २२ हजार ९४५
२०२४ : २५ हजार ८९९
२०२५ (मेपर्यंत) : १२ हजार ३१२





