Alephata bus stand: एसटी प्रशासनाचा मोठा दणका! आळेफाटा बसस्थानक परिसरात ८ वाहनांवर कारवाई
Alephata bus stand: वारंवार येणाऱ्या तक्रारींची एसटी महामंडळाकडून दखल; बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातील अवैध वाहतूक रोखण्यासाठी आक्रमक पाऊल.

Alephata bus stand – आळेफाटा बसस्थानक परिसरात वाढत चाललेली वाहतूककोंडी, अनधिकृत प्रवासी वाहतूक आणि त्यामुळे निर्माण होणारे सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत सेवा मिळावी यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करत आठ वाहनांवर दंड ठोठावण्यात आला.
बसस्थानक परिसरात काही खासगी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी अनधिकृतपणे वापरली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार येत होत्या. या वाहनांमुळे बसस्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होत असून एसटी बसच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत होते. प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आळेफाटा बसस्थानकात संयुक्त कारवाई करण्यात आली. सुरक्षा व दक्षता विभाग, स्थानिक आगार प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्या समन्वयातून बसस्थानक परिसरातील संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीत नो-पार्किंग झोनमध्ये उभी असलेली तसेच नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणारी आठ वाहने आढळून आली. संबंधित वाहनचालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने इशाराही दिला आहे.
कारवाई पुढेही सुरूच राहणार
बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात अनधिकृत प्रवासी वाहतूक, नो-पार्किंग नियमांचे उल्लंघन आणि वाहतूक कोंडी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एसटी प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. एसटी प्रशासनाच्या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अवैध प्रवासी वाहतुकीविरोधातील मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





