SSC HSC Exam 2026 : दहावी–बारावी परीक्षांसाठी ‘कॉपीमुक्त अभियान’! ड्रोन, सीसीटीव्हीद्वारे परीक्षा केंद्रांवर नजर
SSC HSC Exam 2026 : दहावीसाठी ७३ तर बारावीसाठी ४२ केंद्रांवर कडक निगराणी; बोर्ड परीक्षा पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याचे शासनाचे उद्दिष्ट.

SSC HSC Exam 2026 – इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पारदर्शक, कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यभरात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) यांच्यामार्फत बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी पासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दहावीची परीक्षा ७३, तर बारावीची परीक्षा ४२ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत.परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून, झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे, एसटीडी, फॅक्स,
ध्वनीक्षेपक आदी सुविधा परीक्षा कालावधीत बंद राहतील. परीक्षा केंद्रात मोबाइल, ब्लूटूथ, पेजर, इंटरनेटसह कोणत्याही दुरसंचार साधनांवर कडक बंदी असेल. पोलीस आयुक्तालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत मनाई आदेश जारी केला असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.
प्रत्येक केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निगराणी तसेच आवश्यकतेनुसार व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.कॉपी, कॉपीस मदत किंवा गैरप्रकारात सहभागी आढळणाऱ्यांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




