Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा ‘चंद्रमुखी’मधील अभिनय गाजला; मिळवला पहिला ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’

Amruta Khanvilkar: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांचे मन जिंकत पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ पटकावला आहे. ५ ऑगस्ट रोजी मुंबईत थाटामाटात पार पडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार २०२५’ सोहळ्यात तिला ‘चंद्रमुखी’ या गाजलेल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला.
या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला. मात्र, अमृता खानविलकर परदेशात असल्याने ती प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाही. तिच्या अनुपस्थितीत हा पुरस्कार अभिनेता प्रसाद ओक याने स्वीकारला.
अमृताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आनंद व्यक्त करत लिहिले की, “माझा पहिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार… उत्कृष्ट अभिनेत्री…’चंद्रमुखी’…” तिच्या या यशाबद्दल सध्या सोशल मीडियावरून चाहते आणि सहकलाकारांकडून भरभरून प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पुरस्काराबाबत भावना व्यक्त करत अमृता म्हणाली, “आज माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्र राज्याने दिलेला हा सन्मान खूप खास आहे. ‘चंद्रमुखी’साठी आम्ही संपूर्ण टीम म्हणून काम केले. दिग्दर्शकापासून स्पॉट बॉयपर्यंत प्रत्येकाने घेतलेली मेहनत आज सार्थ ठरली आहे. हा क्षण मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. हा माझा पहिला राज्य पुरस्कार आहे.”
तिने पुढे सांगितले, “आता पुढेही दर्जेदार काम करत राहायचं आहे. चांगल्या लोकांबरोबर काम करत उत्तम कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. महाराष्ट्र राज्य पुरस्कार टीमचे मनःपूर्वक आभार. मी या प्रेमाबद्दल कायम ऋणी राहीन.”
‘चंद्रमुखी’ चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. चित्रपटातील गाणीही सुपरहिट ठरली. अमृताच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.




