Srirang Barne : १२ वर्षांत ३६ विधेयके आणि ९६% उपस्थिती; खासदार श्रीरंग बारणेंनी मांडला कामांचा धडाकेबाज रिपोर्ट
Srirang Barne : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीच्या १२ वर्षांचा आणि तिसऱ्या टर्ममधील दोन वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा प्रसिद्ध.

Srirang Barne – खासदारकीच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात मावळ लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला. ३६ खासगी सदस्य विधेयके सादर केली. रेल्वे, रस्त्यांची कामे मार्गी लावली. पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध कामे केली. पाणीपुरवठा कामाला प्राधान्य दिले, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करण्यात यश आल्याचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
लोकसभेत ९६ टक्के उपस्थित राहिलो असून चर्चेत सर्वाधिक सहभाग घेतला. पाचवेळा संसद रत्न, एकवेळा संसद महारत्न आणि दोनवेळा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने सन्मानित झालो असल्याचे बारणे यांनी सांगितले. खासदारकीच्या तिसऱ्या टर्ममधील दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बारणे यांनी कामाचा लेखाजोखा मांडला.
ते म्हणाले, १६, १७ व १८ व्या लोकसभेत २०१२ प्रश्न विचारलेले असून ५१३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. लोकसभेतील उपस्थिती ९६ टक्के आहे. ऊर्जाविषयक लोकसभा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून १२ अहवाल सादर केले. समितीच्या आतापर्यंत ३२ बैठका घेण्यात आल्या असून तीन अभ्यास दौरे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. पनवेल ते उरण रेल्वे मार्गाला गती देऊन गेली अनेक वर्षे रखडलेला रेल्वे मार्ग पूर्ण केला. या मार्गावर लोकल सेवा चालू केली.
पनवेल ते कर्जत या रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर असून लवकरच लोकल सेवा व रेल्वे सेवा चालू होईल. पिंपरी-चिंचवडकरांसाठी सिंहगड एक्स्प्रेसला नव्याने डबा जोडण्यात आला. तळेगांव, शेलारवाडी, जांभुळ, कामशेत येथे नागरीकांच्या सोयीकरीता रेल्वे मार्गिकेच्या खालून भूयारी मार्ग तयार करण्यात आले. कान्हेफाटा, वडगांव, मळवली, लोणावळा या रेल्वेमार्गावर उड्डाणपूल आणि शेलू, पळसदरी, कर्जत, खांडेश्वर, नेरळ, तळोजा या रेल्वेमार्गावर पादचारी उड्डाणपूल मंजुरी घेतली आहे.
काही ठिकाणी कामास प्रारंभ झाला आहे. देहू ते पंढरपूर पालखी मार्गासाठी देहू ते देहूरोड चौक संरक्षण खात्याची जागा असल्याने पालखी मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी संरक्षण खात्याकडे पाठपुरावा सुरू आहे. पुणे-मुंबई महामार्गावर सिंहगड कॉलेज ते खालापूर मिसिंग लिंक नवीन मार्गाला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून घाटातील ट्रॅफिक जाम समस्या सोडवण्यात आली.
प्रवाशांची वेळ, इंधनाची बचत झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पनवेल – उरण ते मुंबई समुद्र मार्गावर अटल सेतू हा देशातील पहिला २२.५ किलोमीटर लांबीचा समुद्र मार्गावरील पूल मावळ लोकसभा मतदारसंघात उभारला असल्याचे बारणे यांनी सांगितले.






