Missing Link Accident News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’वर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जण जखमी
Missing Link Accident News : अपघातानंतर काही काळ द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Missing Link Accident News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’वर शुक्रवारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव बसने तीन खासगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर काही काळ द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
‘मिसिंग लिंक’ (Missing Link ) मार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूक अधिक वेगवान झाली असली तरी अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्नही सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (Missing Link Accident News)
अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने गॅस कटरच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न केले. बचावकार्यादरम्यान जखमींना सुरक्षित बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. विशेष म्हणजे, मिसिंग लिंक परिसरात सलग दोन अपघात घडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यायी लेनवरून वाहने सोडण्याचा निर्णय घेतला.
या अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मुंबई-पुणे महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा : Satara News : शाहूनगरमध्ये पाण्यासाठी रोजच संघर्ष; नगरसेवकांच्या इशाऱ्यानंतरही प्रशासन ढिम्मच

