Open Chamber : कासारवाडीत महापालिकेचा भोंगळ कारभार; उघड्या चेंबरमुळे अपघाताची भीती
Open Chamber : नाशिक फाटा उड्डाणपुलावरून वल्लभनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन ते तीन चेंबरची झाकणे उघडी; वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा जीव टांगणीला.

Open Chamber – कासारवाडी रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर उघड्या आणि तुटलेल्या चेंबरमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा संकलन डेपोसमोरील सुमारे शंभर मीटर अंतराच्या पट्ट्यात दोन ते तीन चेंबरची झाकणे अर्धवट उघडी असून येथे अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन चेंबर सुरक्षित करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नाशिक फाटा उड्डाणपुलावरून महादेव मंदिर परिसरातील भुयारी मार्गामार्गे वल्लभनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. दिवसभर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. दुचाकी, चारचाकी तसेच पादचाऱ्यांची सतत वर्दळ असल्याने उघड्या चेंबरमुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकताच हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला आहे.
मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक चेंबरची अवस्था दयनीय झाली आहे. काही ठिकाणी फायबरची झाकणे बसविण्यात आली आहेत. परंतु ती झाकणे तुटलेली किंवा आतमध्ये खचलेली दिसून येत आहेत. त्यामुळे चेंबरचे खोल भाग उघडे पडले आहेत. या परिसरात महापालिकेचा कचरा संकलन डेपो असल्याने मोठ्या ट्रकची सतत ये-जा सुरू असते.
जड वाहनांच्या दबावामुळे चेंबरवरील फायबर झाकणे तुटून आतमध्ये पडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहन गेल्यास किंवा रात्रीच्या वेळी लक्ष न गेल्यास अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर ठरू शकते.
पावसाचे पाणी साचल्यास उघडी चेंबर वाहनचालकांच्या लक्षात येणार नाहीत. त्यामुळे जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने सर्व चेंबरची पाहणी करून मजबूत झाकणे बसवावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.





