अहमदनगर – दर्जेदार ऊसही “नागवडे’ला द्यावा

श्रीगोंदा -बचार ऊस आणण्यासाठी आमच्याकडे आग्रह धरला जातो, त्याचवेळी चांगला ऊस मात्र खासगी कारखान्यांना घातला जात असल्याने नागवडे कारखान्याला ऊस दराच्या बाबतीत खासगीशी स्पर्धा करणे कठीण जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बचार ऊसासाठी आग्रह धरताना दर्जेदार ऊसही नागवडे कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन शिवाजीराव नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.
“नागवडे’ कारखान्याच्या 49व्या गाळप हंगामाचे गव्हाण पूजन व मोळी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना राजेंद्र नागवडे म्हणाले, परिसरातील खासगी कारखाने दरवर्षी काहीतरी वेगळी घोषणा करून आपल्या कार्यक्षेत्रातील चांगला ऊस नेतात. आपल्या कारखान्याला बचार ऊस शिल्लक राहतो. खराब ऊस गाळप करून भावाची स्पर्धा केल्यास कारखाना अडचणीत येणार असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत- जास्त चांगला ऊस नागवडे कारखान्याला द्यावा, असे आवाहन केले.
नागवडे म्हणाले, मागील गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन अडीच हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला असून दोन दिवसांत प्रतिटन 75 रुपये प्रमाणे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करणार आहोत. जिल्हा बॅंकेच्या संचालिका अनुराधा नागवडे,उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा शुभांगी पोटे, राकेश पाचपुते, सुरेश लोखंडे, टिळक भोस, श्रीनिवास घाटगे, योगेश भोईटे, विठ्ठल वाळुंज कार्यकारी संचालक रमाकांत नाईक,अंजली रोडे उपस्थित होते.





