Nagar : शिर्डीतील ७२ भिकारी ताब्यात

शिर्डी : दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, भयमुक्त शिर्डी करण्यासाठी प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. गुरुवारी पहाटे शिर्डी पोलीस, नगरपरिषद व साईबाबा संस्थान यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डीतील ७२ भिकारी यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बेगर हाऊस येथे करण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डीत अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाल्याने ग्रामस्थांनी व भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकारानंतर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी शिर्डी पोलीस, नगरपरिषद व साई संस्थान प्रशासनाची बैठक घेतली. शिर्डीतील दारू, मटका ,जुगार, गुटखा व इतर मोठ्या प्रमाणात चालणारे अवैध व्यवसायांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी व शिर्डीतील गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी विरोधात कठोर कारवाई करण्याच्या आदेश दिले होते.
शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून ओळख असणारे रणजित गलांडे यांची बदली शिर्डी येथे करण्यात आल्यानंतर गलांडे यांनी पदभार घेताच शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई तसेच तडीपार असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. याबरोबरच शिर्डीतील मोठ्या प्रमाणात सुरू असलेला गुटखा ,जुगार, मटका व इतर अवैध व्यवसायावर छापा टाकण्याची मोहीम हाती घेतली. याबरोबरच गुरुवारी भाविकांना नशा करून पैसे मागण्याकरिता त्रास देणाऱ्या ६० पुरुष तसेच १२ महिला असे एकूण ७२ भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करत त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीने पुरुष भिकाऱ्यांना श्रीगोंदा येथील विसापूर बेगर होम तसेच महिला भिकाऱ्यांना मुंबई येथील बेगर होम या ठिकाणी त्यांची रवानगी करण्यात येणार आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या नशा व अमली पदार्थ सेवन करून भाविकांना त्रास देणारे पकडण्यात आलेले ७२ महिला व पुरुष भिकारी हे शिर्डी, अहिल्यानगर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे ,वाशिम, जळगाव, अकोले, बुलढाणा, नांदेड ,सांगली ,सोलापूर, यवतमाळ, कर्नाटक, मध्यपदेश, आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या ठिकाणाहून शिर्डीत भिक्षा मागण्यासाठी आलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. शिर्डीत भाविकांना व ग्रामस्थांना भिकाऱ्यांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी या विरोधात कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली. शिर्डीतील गुन्हेगारींचा देखील त्यांनी बंदोबस्त करण्यासाठी मोहीम हाती घेतल्याने त्यांच्या या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
शिर्डीत गुरुवारी पोलीस निरीक्षक गलांडे, साई संस्थानेचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांनी ७२ भिकाऱ्यांना पकडून त्यांना बेगर होम येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. शिर्डीत अद्यापपर्यंत एवढी मोठी कारवाई अद्याप झाली नाही. सदर कारवाई सातत्याने सुरूच राहिली पाहिजे तरच शिर्डी भिकारी मुक्त होऊ शकेल, अशी ग्रामस्थांमधून चर्चा आहे.





