नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जतमध्ये दुव्वाधार पाऊस

नगर – जिल्ह्यात मागील एक आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी (दि. १२) रोजी अनेक भागात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. ४९ महसूल मंडलांमध्ये समाधानकारक तर ७ मंडलात ४५ मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्य़ान आज गुरुवार (दि.१३) रोजी नगर शहरात दुपारी ३ वाजेच्या दरम्य़ान पावसाने हजेरी लावली. या पावसाने सखल भागात पाणी साचले होते.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस हा विस्कळीत स्वरूपाचा होता. मात्र. मागील दोन-तीन दिवसांपासून ढगांनी जिल्हा व्यापला आहे. सर्वदूर पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. विशेषताः दक्षिण भागात समाधानकारक पाऊस होत आहे.
शहरातील अनेक रस्त्यांना अक्षरशः नदीनाल्यांचे स्वरूप आले. त्यातच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने सगळीकडे रस्त्यांवर तळे साचले होते. यातून मार्ग काढताना दुचाकी व चारचाकी चालकांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागला. नगर शहरात आज दुपारी 3 च्यादरम्यान पाऊस झाला. ठिकठिकाणी पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले.
दक्षिण भागातील पारनेर, पाथर्डी, शेवगाव, नगर, कर्जत, जामखेड तालुक्यात दुष्काळाची दाहता मोठी होती. टँकरने अनेक गावांना पाणी पुरवठा करावा लागत होता. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक टँकरची संख्या होती. टँकरने या तालुक्यात शंभरी पार केली होती. जिल्ह्यात शनिवारपासून पावसाला सुरूवात झाली. कर्जत तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक २१८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. श्रीगोंदे तालुक्यात २१४ तर पाथर्डी तालुक्या १७६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी १०० ते १२० मिलीमीटर पाऊस झालेली पाहिजे. खरीप हंगामातील पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील महसूल मंडलनिहाय झालेला पाऊस याप्रमाणे
नगर तालुकाः नालेगाव- ३५, सावेडी- १२, कापूरवाडी- ३५, केडगाव- ८.८, भिंगार- २५.५, नागापूर- १३, जेऊर- ४२, वाळकी- ४६.५, चास- ४५, रुईछत्तीशी- ४६.५. पारनेर ः पारनेर-१५, भाळवणी- ८, सुपा- ३९, वाडेगव्हाण- १०.५, निघोज- १.३, टाकळी -२६.३ श्रीगोंदे ः श्रीगोंदे- ३४., काष्टी- ४६.५, मांडवगण- २३, बेलवंडी- ३१.८, पेडगाव- ४६.५, चिंभळे- ३३.३, देवदैठण- ५, कोळगाव- ३०, कर्जत ः राशिन- ५८.३, भांबोरा- २८.५, कोंभळी- ३, कर्जत १५.४,संगमनेरः आश्वी- ५५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नगर तालुक्यातील केडगाव, जेऊर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीमध्ये केडगावात मंडलात ८.८ मिमी. पाऊस झाला असल्याचे आकडेवारी मध्ये दिसत आहे. केडगावमध्ये दोन तास पाऊस होवून नाले ओढे भरभरून वाहिले. शेतात मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी होते. असे असतांनाही अवघा ८.८ मिमी पाऊस झाला कसा असा प्रश्न केडगावकरांना पडला आहे.





