Nagar | तुमच्या मनात जो तोच श्रीगोंदा मतदारसंघाचा उमेदवार

श्रीगोंदा, (प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कुकडी कारखान्याचा प्रश्न सोडला आहे. श्रीगोंदा मतदार संघात कुठलाही निगेटिव्ह मुद्दा राहिलेला नाही. काळजी करू नका, जनतेच्या मनात जो आहे.
तोच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदार संघाचा उमेदवार असेल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगत माजी आमदार राहुल जगताप यांना आश्र्वासित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी (दि.२६) श्रीगोंदा येथे आली होती.
यात्रा श्रीगोंदा येथे आल्यावर माजी आमदार राहुल जगताप यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास खा.अमोल कोल्हे, खा.नीलेश लंके, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, सुनील गव्हाणे, संदीप वरपे, जिल्हाध्यक्ष फाळके, रामेश्वर निमसे, सूरज मोरे, बाबासाहेब भोस, केशवभाऊ मगर, अतुल लोखंडे, दीपक भोसले, हरिदास शिर्के आदिसह मान्यवर उपस्थित होते.
खा.अमोल कोल्हे यांनी बोलताना ज्यांनी साहेबांचे बोट धरून राजकारणात प्रवेश केला त्यांनी इडीच्या धाकाने साहेबांचे बोट सोडले. मात्र भाजपने त्यांची वाईट केलेली अवस्था सर्व जनता पाहत असल्याची टीका अजित पवार यांचे नाव न घेता केली.
सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने येथून पुढे कोणत्याही योजनेला निधी मिळणार नाही. राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या सरकारला मुळासकट उखडून टाकावे, असे आवाहन केले.
सहकार क्षेत्रासह शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. निर्यात बंदी करत शेतीमालाचे बाजार भाव कमी केल्याने तसेच कारखानदारी अडचणीत आणल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारा नेता म्हणून खा.शरदचंद्र पवार यांचे नाव घेतले जाते. राज्यात परिवर्तनाची लाट आली असून महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. सरकार येताच शेतीमालाला आधारभूत बाजारभाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे. खा.नीलेश लंके यांनी सांगितले.
श्रीगोंदा मतदारसंघात कुकडी, घोड पाण्याचा प्रश्न गंभीर असून साकळाई योजना होणे गरजेचे आहे. कुकडी कारखान्यासाठी एनसीडीसीचे कर्ज मिळत असताना केवळ पवार साहेबांसोबत असल्याकारणाने कुकडी कारखान्याला जाणीवपूर्वक डावलले गेले आहे.
कितीही अडचणीत आणले तरी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या पाठिंब्यावर साहेबांच्या सोबत कायम राहणार आणि साहेबांची साथ कधीही सोडणार नाही.
अडचणीच्या काळात जे सोबत होते, त्यांचाच येणाऱ्या काळात विचार करावा, असे आवाहन करत कारखान्याकडे असलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे असलेली देणी ५ ऑक्टोबरपर्यंत देण्यात येतील, असे आश्वासन माजी आमदार राहुल जगताप यांनी सांगितले.




