“श्रीराम कोणत्याही एका पक्षाचे असू शकत नाही’ – सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – अयोध्येतील राम मंदिराचे “राजकारण” केल्याबद्दल भाजपवर टीका करताना, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे की भगवान राम कोणत्याही एका राजकीय पक्षाशी संबंधित असू शकत नाहीत कॉंग्रेसही रामभक्त आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
ते म्हणाले की, श्री रामचंद्र हे कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या अजेंड्यापुरते मर्यादित नाहीत. आम्ही कॉंग्रेसजन श्री रामचंद्रांच्या विरोधात असल्याच्या जो अप्रचार भाजपने चालवलला आहे त्याचे आम्ही खंडन करतो, आम्हीही प्रभू रामालाही समर्पित आहोत, असे सिद्धरामय्या यांनी हिरेनरल्ली येथील प्रभू राम, देवी सीता, भगवान हनुमान यांच्या मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले.
सिद्धरामय्या म्हणाले की, हे मंदिर राजकीय कारणांसाठी नाही तर प्रभू रामाच्या निस्सीम भक्तीतून बांधले गेले आहे.लवकरच आम्ही अयोध्येला भेट देणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. अयोध्येतील चालू घडामोडींवर भाष्य करताना ते म्हणाले की सर्वच राज्यांनी या दिनानिमीत्त सुट्टी जाहीर केलेली नव्हती आणि केंद्र सरकारनेही केवळ अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली.
आसाममधून सध्या निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेत अडथळे आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचा हेतू द्वेषपूर्ण असल्याचा आरोप करून ते म्हणाले की, भाजप राहुल गांधींच्या शांततापूर्ण पदयात्रेत अडथळा आणून ती हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.





