श्रीलंकेतील दहशतवाद्यांच्या म्होरक्याची ओळख पटली; माहीती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर

कोलोंबो – श्रीलंकेतून गुजरातमध्ये आल्यावर अटक झालेल्या इसिसच्या ४ दहशतवाद्यांच्या म्होरक्याची ओळख पटली असल्याचे श्रीलंकेच्या पोलिसांनी म्हटले आहे. श्रीलंकेतील ४६ वर्षीय व्यक्ती हाच या दहशतवाद्यांचा म्होरक्या असावा, असा संशय स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ओसमांद गेरांड असे या संशयिताचे नाव असून तो गेमाकागोडा येथील रहिवासी आहे. तो सध्या वॉन्टेड आहे. आपली ओळख पटू नये, यासाठी तो वारंवार आपली वेशभुषा बदलत असतो. त्याची सध्याची वेशभुषा काय असावी, याबाबत पोलिसांना अंदाज आला आहे, असे स्थानिक माध्यमाने म्हटले आहे.
श्रीलंकेतून घातपाती कारवायांसाठी भारतात गेलेल्या दहशतवाद्यांना गेरांड यानेच मदत केली असावी, असा संशय आहे. त्याच्या ठावठिकाण्याबद्दलची खात्रीशीर माहीती देणाऱ्यांना श्रीलंकेच्या पोलिसांनी २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
श्रीलंकेतून भारतात इसिसचे दहशतवादी आल्याचे उघड झाल्यावर दोन्ही देशांमध्ये या संबंधीच्या माहितीची आदान-प्रदान केली गेली आहे. श्रीलंकेच्या लष्करी गुप्तचर विभाग आणि पोलीस दहशतवादी तपास विभाग देखील या तपासामध्ये सहभागी झाले आहेत.
गुजरात एटीएसने १९ मे रोजी अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर इसिसशी संबंधित या चार दहशतवाद्यांना अटक केली होती. गुजरातमध्ये अटक केलेल्या चार श्रीलंकन नागरिकांची चौकशी करण्यासाठी गेल्या आठवड्यात श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर कारवाई सुरू केली आहे.





