Coach Sumith Murder : क्रिकेट विश्वात मोठी खळबळ! पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या भांडणात खेळाडूकडून कोचची हत्या
Coach Sumith Murder : सुमित फर्नांडो असे या ६२ वर्षीय दुर्दैवी प्रशिक्षकाचे नाव असून, त्यांच्यावरील हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sri Lanka Cricket Coach Sumith Fernando Murder Water Dispute : क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंमध्ये वाद होणे नवीन नाही, मात्र श्रीलंकेतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलंबो येथे एका सामन्यादरम्यान पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादात मध्यस्थी करणे एका ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षकाच्या जीवावर बेतले आहे. सुमित फर्नांडो (Sumith Fernando) असे या ६२ वर्षीय दुर्दैवी प्रशिक्षकाचे नाव असून, त्यांच्यावरील हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकरणी पोलिसांनी एका १७ वर्षीय शाळकरी क्रिकेटपटूला अटक केली आहे.
पाण्याच्या वादातून जीवघेणा हल्ला –
पोलिसांनी गुरुवारी (१३ ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ ऑगस्ट रोजी कोलंबोमधील एका सामन्यादरम्यान घडली. मैदानावर पिण्याच्या पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची सुरू होती. हे भांडण सोडवण्यासाठी सुमित फर्नांडो मध्यस्थी करायला गेले असता एका खेळाडूने त्यांच्यावर कथितरित्या प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या फर्नांडो यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुसल मेंडिसचे गुरु अन् पिच क्यूरेटर म्हणून कार्य –
सुमित फर्नांडो हे मोरातुवा येथील ‘प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेज’चे माजी प्रशिक्षक होते. श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुसल मेंडिसला (Kusal Mendis) त्यांनीच शालेय जीवनात क्रिकेटचे धडे दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुणवंत खेळाडू घडले. याशिवाय त्यांनी श्रीलंकेच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रसिद्ध ‘ब्लूमफील्ड क्रिकेट अँड ॲथलेटिक क्लब’मध्ये पिच क्यूरेटर (पिच प्रभारी) म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. पोलिसांनी सोमवारी १७ वर्षीय आरोपी खेळाडूला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १७ ऑगस्टपर्यंत बालसुधारगृहात पाठवले आहे.
कुसल मेंडिस भारत-श्रीलंका मालिकेतून बाहेर –
दुसरीकडे, फर्नांडो यांचे शिष्य कुसल मेंडिस सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. १५ ऑगस्टपासून भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे, मात्र दुखापतीमुळे कुसल मेंडिस या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे ३ वर्षांनंतर निरोशन डिकवेलाचे श्रीलंकेच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. या मालिकेसाठी धनंजय डी सिल्व्हाकडे कर्णधारपद तर कामिंडू मेंडिसकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.





