सुप्रिया श्रीनेत यांची कंगनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; कंगनाचे सौम्य उत्तर, नंतर पोस्ट हटवली

नवी दिल्ली – अभिनेत्री कंगना रणावतला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने तिला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून रिंगणात उतरवले आहे. त्याचा संदर्भ देत कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी अत्यंत आक्षेपार्ह अशी पोस्ट सोशल मीडियाव टाकली असून नंतर त्यांनी ती हटवत दिलगिरी व्यक्त केली आहे.
श्रीनेत यांनी आज कंगना रणावतचा एक फोटो शेअर करत आज मंडीत काय भाव सुरू आहे अशी आपत्तीजनक विचारणा केली होती. मात्र लवकरच त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी तात्काळ ती पोस्ट हटवली.
ज्या व्यक्तीकडे आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा ॲक्सेस आहे त्याची ही कृती असल्याची सारवासारवही श्रीनेत यांनी केली. दरम्यान, कंगनानेही तिच्या आक्रमक स्वभावानुसार ताबडतोब या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माझ्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम खात्यापर्यंत पोहोचू शकणाऱ्या कोणा व्यक्तीने अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. ती हटवण्यात आली आहे. जे लोक मला ओळखतात त्यांना याची कल्पना आहे की मी कोणत्याही महिलेबद्दल असे काही लिहू शकत नाही असा दावा श्रीनेत यांनी केला आहे.
आपण या संदभात तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत कंगना सुप्रिया श्रीनेत यांना उद्देशून म्हणाली की माझ्या गेल्या २० वर्षांच्या अभिनयातील कारकीर्दीत मी विविध महिलांच्या भूमिका साकारल्या आहेत.
त्यात एका लहानशा गावातील मुलीपासून धाकडमधील महिला गुप्तहेरापर्यंतच्या भूमिकांचा समावेश आहे. आपल्याला आपल्या मुलींना या पूर्वग्रहातून मुक्त करावे लागेल. प्रत्येक महिला आदारास पात्र असते त्यामुळे महिलांची बदनामी करण्यापासून स्वत:ला वाचवले पाहिजे.





