SPPU News: “परीक्षेचे काम नाकारले तर थेट नियुक्ती रद्द”; पुणे विद्यापीठाचा प्राध्यापकांना कडक इशारा
SPPU News: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ४८ चा दाखला; परीक्षा कामाकडे पाठ फिरवणे गंभीर गैरवर्तन मानले जाणार.

SPPU News- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे काम वेळेवर, पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी प्रशासनाने नियोजनास सुरुवात केली आहे. परीक्षांचे नियोजन सुरू असताना प्राश्निक, परीक्षक, नियामक, बहिःस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक किंवा भरारी पथकावर नेमणूक होऊनही गैरहजर राहणाऱ्या प्राध्यापकांवर आणि त्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या संस्थांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिला आहे.
विद्यापीठाने अहिल्यानगर, नाशिक व पुणे जिल्ह्यांतील सर्व संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांच्या प्राचार्यांना, संचालकांना परिपत्रक पाठवले आहे. मागील परीक्षांच्या काळात अनेक प्राध्यापक विविध कारणे सांगून किंवा परस्पर दांडी मारून विद्यापीठाच्या परीक्षाविषयक कामकाजाकडे पाठ फिरवत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, निकाल वेळेत जाहीर करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ४८ (३) (ब), (४) व (५) चा दाखला देऊन कायद्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापनाशी संबंधित कामांमध्ये मदत करणे हे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर बंधनकारक असल्याचे सांगितले. या आदेशाचे उल्लंघन करणे हे गंभीर गैरवर्तन मानले जाते. असे आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
विशेष समितीची स्थापना
परीक्षेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. समिती कुलगुरूंना अहवाल सादर करेल. कुलगुरूंच्या निर्देशानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक दोषींवर कायदेशीर कारवाई करतील. त्यामुळे आगामी हिवाळी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ज्या प्राध्यापकांची निवड झाली आहे, त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, असे निर्देश संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी दिले आहेत.





