SPPU News: पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार! विधी शिक्षणाचे स्वप्न धोक्यात, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार?
SPPU News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निकालाला विलंब; तीन वर्षीय एलएलबी (LLB) प्रवेश फेरीची मुदत संपत आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उद्विग्नता.

SPPU News – माझे वकिलीचं शिक्षण घेण्याचं स्वप्न आहे, पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभारामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती आहे, ही उद्विग्न प्रतिक्रिया आहे कुणाल बोरकर या विद्यार्थ्याची. परीक्षा संपून महिना झाला तरी विद्यापीठाने अद्याप अंतिम वर्षाचा निकाल जाहीर केलेला नाही. परिणामी, विधीची प्रत्यक्ष प्रवेश फेरीची मुदत संपत आली असतानाही निकाल हाती नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना तीन वर्षीय एलएलबी प्रवेशासाठी नोंदणीच करता येत नाही.
मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्सचा टी.वाय. बीबीए (इंटरनॅशनल बिझनेस) चा विद्यार्थी असलेल्या कुणालची मे २०२६ मध्ये अंतिम सत्राची परीक्षा झाली. मात्र, विद्यापीठाने निकाल न लावल्याने त्याला गुणपत्रिका मिळालेली नाही. दुसरीकडे, विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची अंतिम मुदत ३० जून आहे. पोर्टलवर सर्व सत्रांचे गुण भरणे अनिवार्य असल्याने निकालाअभावी विद्यार्थ्यांचे अर्ज रखडले आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागात हेलपाटे मारले असता, आधी २७ जूनपर्यंत थांबण्यास सांगण्यात आले आणि आता पुन्हा तीन दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला जात आहे. ३० जून ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने निकाल जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
निकालाला झालेला विलंब हा पूर्णपणे विद्यापीठाच्या स्तरावरील आहे. विद्यापीठाच्या सुस्त कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि करिअर धोक्यात आले आहे. परीक्षा विभागाने यावर तातडीने मार्ग न काढल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ‘स्टुडंट हेल्पिंग हँड्स’चे संस्थापक अध्यक्ष ॲड. कुलदीप आंबेकर यांनी दिला आहे.
“बीबीए अभ्यासक्रमाची परीक्षा ८ व ९ मे रोजी संपणार होती. त्याच दिवशी एमबीए अभ्यासक्रमची सीईटी असल्याने ह्या परीक्षा १९ व २० मे रोजी घेण्यात आली. आता परीक्षेचा निकालाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, तीन-चार दिवसांत निकाल जाहीर केले जातील.”
– डाॅ. राजेंद तलवारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ




