SPPU News : पुणे विद्यापीठात अन्नाचा दुष्काळ? मेसमध्ये फक्त वरण-भात; संतप्त विद्यार्थ्यांचे रिफेक्टरीसमोर आंदोलन
SPPU News : आखाती देशांतील तणावामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; दोन दिवसांपासून पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये केवळ वरण-भात मिळत आहे.

SPPU News – विद्येचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या अभ्यासापेक्षा अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या गॅस तुटवड्याचा थेट फटका विद्यापीठाच्या मेसला बसला असून, दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना अपुऱ्या, बेचव जेवणाचा सामना करावा लागत आहे. याचा निषेध करण्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने शनिवारी रिफेक्टरीसमोर आंदोलन केले.
विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात गेल्या दोन दिवसांपासून केवळ वरण-भात दिला जात आहे. मुलांच्या मेसमध्ये अर्धवट शिजलेली एकच भाजी दिली जात आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे जेवण नीट शिजवले जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने गॅस तुटवड्याचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना उपाशी ठेवू नये, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
विद्यापीठातील चारही मेस आणि कॅन्टीनमधील सेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कुलगुरूंनी या गंभीर प्रश्नात तातडीने लक्ष घालून पर्यायी इंधन व्यवस्था करावी आणि विद्यार्थ्यांचे जेवण सुरळीत करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

