– राजेंद्र चोपडे Editorial : आसामच्या निवडणुकीची सारी जबाबदारी प्रियंका गांधी-वढेरा यांच्यावर टाकल्याने (Editorial) त्यांच्या नेतृत्वाची, राजकीय कौशल्याची ही परीक्षा असेल. प्रियंका आसाममध्ये काय राजकीय प्रयोग करतात, त्याला कितपत यश येते यावर त्यांचे आणि काँग्रेसचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. निवडणूक आयोगाने आसाम विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वीच दिल्लीतील काँग्रेसश्रेष्ठींनी आसामची निवडणूक गांभिर्याने घेतलेली होती. यावर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीमध्ये राज्यातील उमेदवार छाननी समितीच्या अध्यक्षपदी प्रियंका गांधी यांची निवड घोषित केली. या निवडीनंतर प्रियंका यांच्या राज्याच्या भेटी वाढल्या आहेत. त्यांनी पक्ष संघटनेत, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच काँग्रेसने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील 23 मतदारसंघातील उमेदवारही जाहीर केले होते. राज्यातील छोट्या-मोठ्या पक्षाशी समझोते करत त्यांच्यासाठी पंधरा जागा सोडल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून खासदार गौरव गोगोई यांचे नाव जाहीर केले आहे. गोगोई राहुल यांचे नजीकचे सहकारी असून ते संसदेतील उपनेतेही आहेत. त्यातच आसामसारख्या छोट्याशा राज्याच्या छाननी समितीची सूत्रे प्रियंका यांच्या हाती देताना काँग्रेस पुन्हा एक प्रयोग करत आहे. Priyanka Gandhi तसे बघायला गेले तर प्रियंका यांच्याकडे अशी मोठी जबाबदारी देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळीही तेथील सूत्रे त्यांच्याकडे सोपविली होती. त्याकाळी तुलनेने नवख्या असलेल्या प्रियंकांनी उत्तर प्रदेशातील संघटनेत चैतन्य आणण्याचा, कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयोग फसला होता. 2019 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही वर्षांत म्हणजे 2022 मध्ये त्यांच्याकडे उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी दिली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेशात काँग्रेसला 403 सदस्यांच्या विधानसभेत फक्त दोन जागा जिंकता आल्या. प्रियंका यांच्याकडे उत्तर प्रदेशची धुरा सोपविली तेव्हा त्यांनी राजकीय चमत्कार घडवावा अशी अपेक्षा होती. विविध कारणांमुळे त्यांना तेथे अपयश आले. त्याचे एक कारण म्हणजे उत्तर प्रदेशात विकलांग झालेली पक्ष संघटना. अल्पावधीत प्रियंका यांना तेथे राजकीय चमत्कार घडवून आणणे अशक्य होते. राज्यात काँग्रेस दखलपात्र पक्ष नसून तो काही स्पर्धेतील पक्ष नव्हता. तेथे पक्षाला शून्यापासून तयारी करावयाची होती. उत्तर प्रदेशच्या तुलनेत आसाममधील राजकीय स्थिती वेगळी आहे. मुळात आसाम छोटे राज्य आहे. तेथे काँग्रेसच भाजपाचा प्रमुख स्पर्धक आहे. तेथील पक्षाची संघटना अजूनही चांगल्या स्थितीत आहे. यामुळे प्रियंका येथील विधानसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वाचा, संघटन कौशल्याचा आणि करिश्म्याचा प्रभाव दाखवू शकतात. त्यातच एक राष्ट्रीय पातळीवरील हसतमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या नेत्या म्हणून राष्ट्रीय राजकारणात गेले काही दिवस त्या आपला ठसा उमटवत आहेत. त्यामुळे प्रचार काळात त्यांची राजकीय कोंडी करणे सहज शक्य होणार नाही. तसेच उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर यमुनेखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. प्रियंका सध्या केरळमधील वायनाड मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे आसामबरोबर केरळ विधानसभेचीही निवडणूक होत आहे. मात्र, काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांना केरळऐवजी आसामची जबाबदारी दिली आहे. त्याचे कारण म्हणजे केरळमधील जनता आलटून-पालटून आघाडी सरकारला संधी देत असते. सध्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन 2016 पासून सलग दुसर्यांदा राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत. राज्याच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड असून त्यांना राज्यपातळीवर समर्थ टक्कर देणारा मजबूत नेता काँग्रेसकडे नाही. यामुळे कदाचित, काँग्रेसने तुलनेने दुहेरी लढत असलेल्या आसामची जबाबदारी दिली असावी. केरळमधील आघाडीचे राजकारण आणि त्यात समतोल साधणे ही बाब तशी सोपी म्हणता येणार नाही. अनेक कारणांनी आसाम हे काँग्रेससाठी पूर्व भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे. गांधी कुटुंबातील एखाद्या सदस्याने उमेदवार छाननी निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणे ही घटना प्रथमच घडत आहे. या भूमिकेत प्रियंकांना उमेदवारांच्या याद्या अंतिम करण्याबरोबर राज्यातील लहान पक्षांशी युतीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. गेले काही महिने प्रियंका भाजपाविरुद्ध संसदेत जोरदार टीका करत आहेत. संसदेतील त्यांचे हसरे व्यक्तिमत्त्व आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी नर्मविनोदी संवाद साधण्याच्या शैलीने त्यांनी प्रसार माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागांसाठी मतदान होणार असून गेल्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 75 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला 50 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही आघाड्यांच्या मतांच्या वाट्यातील अंतर फक्त 1.6 टक्के होते. यामुळे राज्यातील लहान-सहान पक्षांशी समझोता केला तर काँग्रेस एनडीएला चांगले आव्हान देऊ शकते. आसाम काँग्रेसचे अध्यक्ष असलेले गौरव गोगोई हे एक तरुण नेते आहेत. त्यांचे वडील तरुण गोगोई हे अनेक वेळा आसामचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसला सत्तेवर आणणे हे गोगोई यांच्यासमोरील आव्हान तसे सोपे नाही. मुख्यमंत्री असलेले हिमंता बिस्व सरमा हे भाजपचे पूर्व भारतातील पोस्टर बॉय आहेत. मूळचे काँग्रेसचे असलेले सरमा यांना काँग्रेसी राजकारणाची सारी सूत्रे माहिती असल्याने त्यांच्या विरोधात गौरव गोगोई यांना राजकीय पाठबळ देण्यात प्रियंकाच्या नेतृत्त्वाची मोठी मदत होऊ शकते. आपल्या आसामच्या पहिल्या दौर्यात प्रियांका यांनी सरमा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. सरमा आणि कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर बेनामी, अवैध संपत्ती जमा केल्याचा आरोप करत थेट सरमा यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले होते. प्रियंकानी काही प्रयोग करण्याचे ठरवले आहे. त्याचा एक भाग म्हणून त्यांनी राज्यातील नेत्यांचे पाच गट स्थापन केले आहेत. जनतेचा मूड समजावा यासाठी या पथकांनी राज्यात फिरून तळागाळातील संस्था, स्थानिक संघटना, व्यावसायिक, विचारवंत आणि सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. त्यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे काँग्रेसने सरमा सरकारविरोधातील आरोपपत्र जाहीर केले. तसेच या माहितीच्या आधारे प्रत्येक मतदारसंघात पक्षाकडे असणार्या सक्षम उमेदवाराची निवड केली जाणार आहे. प्रियकांच्या या प्रयोगाला यश मिळाले तर काँग्रेस पक्ष भविष्यात अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी अशाच प्रकारे उमेदवार निवड करण्याची शक्यता आहे. एक प्रकारे उमेदवार निवडीत काँग्रेसचा हा पथदर्थी प्रकल्पच मानला पाहिजे. प्रियंका यांचे आव्हान निष्प्रभ करण्यासाठी सरमा यांनीही पावले टाकले आहेत. काँग्रेसची कोंडी करण्यासाठी वजनदार पण नाराज नेत्यांना हेरून सरमा आपलेसे करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेनकुमार बोरा यांचा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. प्रियंकांच्या भूमिकेमुळे यावेळची आसामची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. सलग दहा वर्षे भाजप सत्तेत असून काही प्रमाणात असलेल्या प्रस्थापित राजकारण्याविरूद्धच्या असंतोषाचा फायदा उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.