पिंपरी | कान्हेतील महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कान्हे, (वार्ताहर) – येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महाअभियान राबविण्यात आले. मावळ तालुक्यातील आदिवासी बांधवांनी अभियानातून विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महाअभियानात नवीन आधार कार्ड काढणे, रेशन कार्ड दुरुस्ती करणे अथवा अर्ज करणे, जातीचे प्रमाणपत्र, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, आरोग्य विभागाच्या विविध योजना,
जनधन बँक खाते, आयुष्यमान भारत कार्ड, जॉब कार्ड, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आदी योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना एकाच छताखाली घेता आला.
कान्हे ग्रामपंचायत येथील महाअभियानात एकाच छताखाली सर्व दाखले मिळाल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तालुक्यातील आदिवासी नागरिकांचा अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला.
तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार, पंचायत समिती अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कान्हे नायगाव सरपंच विजय वामन सातकर यांसह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





