पुणे जिल्हा : भोरमध्ये मतदार जागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भोर – आगामी भोर विधानसभेच्या निवडणुकीत मतांची टक्केवारी कशी वाढेल, यासाठी अधिकारी गावात जाऊन मतदारांमध्ये जनजागृती कार्यक्रम सुरू झाला. नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या एसव्हीड़इपी नोडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांमध्ये इव्हीएम तसेच व्हीव्हीपीएटीसंदर्भात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदान यंत्राबाबत जागृतीचे काम सुरू आहे.
९ ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम चालणार आहे. भोर मंडळातील उत्रौली, वडगाव डाळ, खानापूर, पाले, नेरे, धावडी सोबत सर्वच महसुली गावात कोंडगाव, शिंद, महुडे, भानुसदरा, साळूगण, वेळवंड, राजघर, नांदघर, भोर, भोलावडे, आंबवडे, बारे या मंडळातील सर्व गावात मतदारामध्ये सदर मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे.
सदर मतदार जनजागृती मोहिमेत मंडल अधिकारी एम. ए. शेख, रवी मनाळे, तलाठी प्रमोद बोरचाटे, अनुराधा डोंगरे, धनश्री पवार, रविराज मैंद, अमोल सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. ९ ऑक्टोबरपर्यंत उर्वरित किकवी, संगमनेर नसरापूर, वेळू, निगुडघ गावांमध्ये ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन नोडल अधिकारी परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे यांनी केले आहे.
मतदान यंत्राविषयी गैरसमज दूर…
ईव्हीएम मशिन हाताळणे, दिलेल्या उमेदवारालाच मत मिळाले की नाही, हे व्हीपीटीवर तपासणे याबाबत डेमो करून मतदारांच्या मनात ईव्हीएमबाबत विश्वास दृढ करण्यासाठी हा उपक्रम शासनस्तरावरून राबवला जात आहे. मतदारांमध्ये मतदान यंत्राविषयी गैरसमज दूर करण्यात येत आहेत. याकामी सर्व मंडल अधिकारी, तलाठी, मतदार जनजागृती करीत आहेत.





