कुरकुंभ -येथील औद्योगिक वासहतीमधील हेंकेल इंडिया कंपनी पुरस्कृत एडरेस्टमार्फत रिसर्च वर्ल्ड या उपक्रमांतर्गत शालेय तालुका स्तरीय विज्ञान स्पर्धेचे आयोजन शुक्रवार (दि. 20) कुरकुंभ या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील साधारण 40 ते 42 शाळांनी सहभाग नोंदविला. शालेय मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे व विद्यार्थी संशोधनाकडे वळवणे असा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
पर्यावरण, पाण्याची बचत, टाकाऊपासून टिकाऊ, विजेची बचत अशा अनेक विषयांवर आधारीत प्रकल्प विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे, सरपंच राहुल भोसले, हेंकेल इंडिया कंपनीचे डॉ.जयेश शाह, डॉ. कपाडिया, डॉ. खंडागळे, शेनॉथ, एडरेस्टचे धीरज रणखांबे, फिरंगाई विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब भापकर, पोलीस पाटील रेश्मा शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात जाधववाडी (गिरीम) जिल्हा परिषद शाळाने प्रथम क्रमांक पटकावला, तर जवाहरलाल विद्यालय केडगाव – द्वितीय आणिशेठ ज्योती प्रसाद विद्यालय दौंड व जि. प.शाळा – साखरवाडी, पाटस यांनी तिसरा क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांकास कंपनीच्या वतीने प्रयोगशाळा साहित्य देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.