भरधाव मोटारसायकलची शाळकरी मुलाला धडक; चालक घटनास्थळावरुन पसार
रस्त्यावरील वाहनचालकांच्या बेफिकीरपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

न्हावरे:- गुनाट ते शिंदोडी रस्त्यावर भरधाव आणि निष्काळजीपणे मोटारसायकल चालविणाऱ्या चालकाने सायकलवरुन जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे.
या अपघातात सदर मुलगा गंभीर जखमी झाला असून, अपघात घडल्यानंतर जखमी बालकाला कोणतीही वैद्यकीय मदत न करता मोटारसायकल चालक घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
सदरची घटना दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजून १० मिनिटांच्या सुमारास शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे गुनाट (ता.शिरुर) येथे गुनाट ते शिंदोडी रस्त्यावर घडली.
या अपघातात कृष्णा विलास आडसुरे (वय ११, रा. शिंदोडी रोड, गुनाट, ता. शिरुर, जि.पुणे) हा बालक गंभीर जखमी झाला आहे. भरधाव मोटारसायकलने त्याच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला, नाकाला, तोंडाला आणि हनुवटीला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दोन्ही हात व पायांनाही दुखापत झाली असून, सायकलचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी भाऊसाहेब पोपट आडसुरे (वय ४५, रा. गुनाट, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन बाल्य़ा चव्हाण (पूर्ण नाव माहीत नाही, रा. शिंदोडी, पो. निमोणे, ता. शिरुर, जि.पुणे) या मोटारसायकल चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तसेच मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संबंधित चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे मोटारसायकल चालविली. त्यातून बालकाच्या सायकलला पाठीमागून धडक बसली.
विशेष म्हणजे, अपघातानंतर जखमी बालकाची विचारपूस करणे किंवा त्याला वैद्यकीय मदत मिळवून देण्याऐवजी चालकाने घटनास्थळावरुन पळ काढल्याचा आरोप आहे.
अपघात घडवून जखमीला मदतीसाठी वाऱ्यावर सोडून जाण्याचा हा प्रकार गंभीर असून, रस्त्यावरील वाहनचालकांच्या बेफिकीरपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विशेषतः गावांमधील रस्त्यांवरून लहान मुले सायकलने ये-जा करीत असताना वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले हे करत आहेत.





