Badlapur News : भरधाव कारने मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं; घटना सीसीटीव्हीत कैद, प्रकृती चिंताजनक
Badlapur News : या घटनेमुळे बदलापूर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Badlapur News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे यांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. या अपघातात शेटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरुन फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास बदलापूर पूर्वेतील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर हा अपघात झाला.
नेमकं काय घडलं? (Badlapur News)
राजेश शेटे हे दुचाकीवरून बिलोली परिसरातून आदर्श स्कूलकडे जात होते. त्यावेळी आदर्श नगरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर राजेश शेटे गंभीर जखमी झाले.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. (Badlapur News)
दरम्यान, अपघात घडवून चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे संबंधित वाहन चालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. वाहनाचा क्रमांक आणि चालकाची ओळख पटविण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली. शेटे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत फरार चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे बदलापूर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
कोण आहेत राजेश शेटे? (Badlapur News)
राजेश शेटे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) मुरबाड विधानसभा अध्यक्ष आहेत. ते बदलापूर आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रातील मनसेच्या संघटनात्मक कामकाजात सक्रिय असून स्थानिक राजकारणात परिचित चेहरा मानले जातात.





