Devendra Fadnavis – आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत. तसेच वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकासकामांची माहिती दिली. devendra wari फडणवीस म्हणाले, यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार आहे. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना आणखी कोणत्या सुविधा हव्यात त्या करून द्याव्यात. पालखी तळावर कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची कामे करावीत. पालखी तळावर वारकऱ्यांसाठी गेल्या वर्षी हँगरची व्यवस्था करण्यात आली होती, त्या प्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सुचना त्यांनी केल्या. दरम्यान, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील ९५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ५ हजार मोबाईल शौचालये पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. गेल्या वर्षी दोन्ही पालखी मार्गावर ३७०० मोबाईल शौचालये पुरविण्यात आली होती. यंदा ५ हजार मोबाईल शौचालये पुरविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गाची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.