प्रेक्षकाला मारहाण प्रकरण; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

ठाणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर आज पोलिसांनी अटक केली आहे. आव्हाड यांच्यासह आणखी काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला “हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
या राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. वर्तकनगर पोलिसात गुन्हा कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना आज दुपारी अटक केली. यानंतर आता त्यांना आजची रात्र पोलीस स्टेशनमध्येच घालवावी लागणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे न्यायालयात आणणार नाहीत, त्याऐवजी त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी स्वःत ट्विट करत माहिती दिली. “हर, हर महादेव’ चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झाले असून शिवाजी महाराजांची बदनामी झाली आहे. या बदनामीला विरोध करत असल्याने अटकेची कारवाई होत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकार मला शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगण्यापासून रोखत आहे, हे सरकार कोणाचे आहे हे स्पष्ट होत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले.





