जितेंद्र आव्हाड झाले भावूक; म्हणाले – “मी कुठेतरी दूर निघून जातो, पण..’

ठाणे – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला भावनिक आवाहन केले आहे. तुम्ही सगळे परत या, मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो, असे भावनिक वक्तव्य आव्हाडांनी केले आहे. “आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो,’ असेही ते पुढे म्हणाले. शरद पवारांचे स्वागत करण्यासाठी ते ठाणे टोलनाक्याजवळ आले होते. तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आव्हाड पुढे म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या लोकांनी परत यावं. माझाच अडसर असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे. मी आणि जयंत पाटील यांना देखील राजकारणातून बाजूला घेऊन जातो. तसेच, शरद पवारांना 84 व्या वर्षी असे वागवता आहात हे चुकीचे आहे. त्यांना निवृत्त व्हा असे म्हणणे बरोबर नाही. ज्याप्रकारे त्यांच्याबद्दल वक्तव्य झाली ती बरोबर नाहीत,’ असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आव्हाडांच्या या वक्तव्यावर त्यांचे माजी सहकारी आनंद परांजपे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “तुम्ही जर आधीच नीट वागला असता, तर ही वेळ आलीच नसती,’ असे परांजपे म्हणाले.





