विशेष : हिरवे स्वप्न पाहणारा नेता

– प्रा. डॉ. सुभाष राठोड
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत वसंतराव नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. 1 जुलै रोजी त्यांची जयंती ‘कृषिदिन’ म्हणून साजरी केली जाते.
वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फुलसिंग, तर आईचे नाव हुनकीबाई. त्यांचे घराणे गोरवंशीय व रणसोत गोत्रातील असून समाजात त्यांना आदराने ‘नाईक’ म्हणजे पुढारी संबोधले जायचे. गोरबंजारा समाजाच्या स्थायिकतेसाठी त्यांचे आजोबा चतुरसिंग यांनी गहुली वसवले होते. लहानपणापासूनच वसंतराव यांना शेती व मातीची जाण होती.
वसंतराव यांचे प्राथमिक शिक्षण पुसद व विठोली येथे तर माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले. त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. तसेच एलएल.बी पदवी मिळवली. महाविद्यालयीन काळात अमेरिकन विचारवंत डेल कार्नेगी, स्वामी विवेकानंद, गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यांनी केवळ ज्ञानसंपादनासाठी शिक्षण घेतले नाही, तर समाजात परिवर्तन घडवण्यासाठी ते उपयोगी कसे ठरेल, याचा नेहमीच विचार केला.
1941 मध्ये त्यांनी नागपूरच्या घाटे कुटुंबातील वत्सलाताईंशी आंतरजातीय विवाह केला, जो त्या काळात सामाजिकदृष्ट्या क्रांतिकारी पाऊल होते. हा विवाह समाजातील जातीय विषमता, रूढी आणि बंधनांना छेद देणारा निर्णय होता. वत्सलाताई सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या नेहमीच स्त्री सक्षमीकरण, बालिका शिक्षण आणि महिला आरोग्य यासाठी कार्यरत होत्या. त्यांच्या सहवासात वसंतराव नाईक यांचे नेतृत्व अधिक संवेदनशील आणि समतावादी झाले.
वकील म्हणून कारकिर्दीची सुरुवात करताना त्यांनी गोरगरीब, शेतकरी, आदिवासी, भटके-विमुक्त, बंजारा समाजासाठी आपली सेवा वाहिली. यामुळेच त्यांची प्रतिमा ‘जनतेचा वकील’ अशी झाली. त्यांच्या सामाजिक जाणिवांमुळे ते हळूहळू सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. 1943 मध्ये पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष, 1946 मध्ये पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. 1946 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथून त्यांच्या राजकीय प्रवासाला गती मिळाली.
1952 मध्ये पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून ते महसूल उपमंत्री झाले. राज्य पुनर्रचनेनंतर 1957 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्यात कृषिमंत्री झाले. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर ते महसूल मंत्री म्हणून कार्यरत राहिले. 1963 मध्ये विदर्भातील नेते मारोतराव कन्नमवार यांच्या मृत्यूनंतर ते मुख्यमंत्री झाले. यानंतर सलग 12 वर्षांहून अधिक काळ ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले.
हा एक अभूतपूर्व विक्रम ठरला. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा विकास नवे शिखर गाठू लागला. त्यांनी राजकारणात शासन आणि जनतेशी नाळ या दोन्ही गोष्टींचा अद्वितीय समतोल साधला. त्यांच्या योजनांमध्ये केवळ घोषणा नव्हत्या, तर अंमलबजावणीसाठी सुसंगत यंत्रणा होती. वसंतराव नाईक हे शेतकर्यांचे नेते होते. त्यांनी कृषी क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडवले.
शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा या विचारातून हरित क्रांती, श्वेत क्रांती, बियाणे महामंडळ, कृषी विद्यापीठे, सिंचन योजना, वसंत बंधारे, शेतकरी मासिक, शेती सल्ला केंद्र, कृषी प्रदर्शन, खत व बियाण्यांची वितरण योजना अशा अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या आणि त्यांच्या माध्यमातून शेतीला नवसंजीवनी दिली.
ते पुण्यातील शनिवार वाड्यासमोर एका भाषणात म्हणाले होते, दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी फाशी जाईन. हे त्यांच्या कृषीप्रती समर्पणाचे प्रतीक होते. राहुरी, परभणी, अकोला आणि दापोली येथे कृषी विद्यापीठे स्थापन करून त्यांनी आधुनिक शेतीशास्त्र सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवले.
वसंतराव नाईक यांनी केवळ कृषी नव्हे तर औद्योगिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सांगली, लातूर या भागांमध्ये औद्योगिक वसाहती विकसित केल्या. यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळाली. कोराडी, परळी, खापरखेडा येथे औष्णिक विद्युत केंद्रे उभी करून त्यांनी महाराष्ट्राच्या ऊर्जा गरजांची पूर्तता केली. नवी मुंबई व औरंगाबादसारख्या नवशहरीकरण प्रकल्पांची, सिडकोची सुरुवातही त्यांच्या कार्यकाळात झाली.
1972 मध्ये महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. अशा कठीण वेळी त्यांनी ‘रोजगार हमी योजना’ राबवली, जी पुढे संपूर्ण देशात मॉडेल ठरली. यामुळे लाखो ग्रामीण युवकांना काम मिळाले, मजुरांचे स्थलांतर थांबले, तर दुसरीकडे जलसंवर्धन व ग्रामीण पायाभूत विकासही झाला. ग्रामीण भागात शेकडो बांधकामे, तलाव, वसंत बंधारे उभे राहिले. त्यांनी कमाल जमीनधारणा कायदा लागू करून भूमिहीनांना लाखो एकर जमीन दिली. या कार्यामुळे दलित, आदिवासी, विमुक्त-भटके, अल्पभूधारकांना नवी आशा मिळाली.
1964 मध्ये त्यांनी मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला. 1967 मध्ये बालभारती मंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध केली. किशोर मासिक, जीवन शिक्षण मासिक, ग्रामीण विज्ञान परिषद यांच्या माध्यमातून शिक्षण व विज्ञान यांचा प्रचार झाला. त्यांनी नेहमीच सांगितले, शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. नाईकांच्या दूरदृष्टीमुळे वसंत बंधारे आणि पाझर तलाव यांसारख्या जलसंधारण योजनांनी ग्रामीण भागातील शेती सक्षम केली.
त्यांनी नवी मुंबई आणि नवे औरंगाबाद हे नियोजनबद्ध शहर उभारण्याचा संकल्प केला. यामुळे नागरीकरणाचे ओझे कमी होऊन समतोल विकासास चालना मिळाली. लोकशाही विकेंद्रीकरण आणि ग्रामविकासासाठी त्यांनी पंचायतराज यंत्रणेचे पुनरुज्जीवन केले. ग्रामसभा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिसूत्री रचनेद्वारे गावकर्यांमध्ये सहभागाचे बळ दिले. ग्रामीण रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, महिला बालकल्याण या विभागांसाठी स्वतंत्र निधी वाटपाची कार्यपद्धती त्यांनी राबवली.
त्यांनी यवतमाळ व नागपूर परिसरातील आदिवासी भागांना ‘मॉडेल ट्रायबल ब्लॉक्स’ म्हणून विकसित केले. त्यांच्या दृष्टिकोनात माणूस हाच केंद्रबिंदू होता. वसंतराव हे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन असलेले नेते होते. त्यांनी जपान, अमेरिका, युगोस्लाव्हिया, चीन या देशांचा कृषी क्षेत्रातील अभ्यास दौरा केला. त्यांनी संकरीत बियाणे, यांत्रिक शेती, कृषी आधारित उद्योगांचे महत्त्व समजून घेतले.
कृषी धोरण, सिंचन तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, संकरित वाण निर्मिती याचा अभ्यास करून त्यांनी भारतात अनेक प्रयोग राबवले. त्यांच्या विचारांची दखल ‘इंडिया काउन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर’ आणि आंतरराष्ट्रीय ‘राईस कमिशन’ने घेतली होती. यामुळे त्यांना भारताचे कृषितज्ज्ञ, हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख मिळाली. 18 ऑगस्ट 1979 रोजी सिंगापूर येथे त्यांचे निधन झाले.





