पुणे | ससूनमध्ये बालक, गर्भवतींसाठी विशेष विभाग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आनुवंशिक आजारांवरील उपचार आणि त्यावर संशोधन व्हावे, यासाठी ससूनमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन पेडियाट्रिक क्लिनिकल जेनिटिक्स विभाग सुरू करण्यात येणार आहे. गर्भवती महिला आणि नवजात बालकांना या विभागाचा सर्वाधिक लाभ होईल व महागड्या तपासण्या कमी दरात होतील.
वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय (ससून) यांच्यामार्फत सेंटर ऑफ एक्सलन्स इन पेडियाट्रिक क्लिनिकल जेनिटिक्स विभाग सुरू करण्यात येणार आहे.
ससूनमधील बालरोग आणि प्रसूती विभागातर्फे निदान आणि उपचार देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी निवड झालेले ससून हे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.
बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर म्हणाल्या, आनुवंशिक आजारांवरील उपचारांसाठी बालरोग विभागातर्फे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केला आहे. ओपीडीत संशयित आनुवंशिक आजारांच्या गर्भवती आणि बालकांची तपासणी करण्यात येईल.
ओपीडी दर सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एक दरम्यान सुरू राहणार आहे. आनुवंशिक आजारांच्या तपासण्या महागड्या असतात. त्यामुळे अनेकांना त्या करणे शक्य नसते.
ससून रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्याने अनेकांना याचा लाभ होणार आहे. तपासण्या, आजारांचे निदान, उपचार, संशोधन याबरोबरच समुपदेशनही करण्यात येणार आहे.
या विभागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. शिवाजीनगर येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या जीन हेल्थ लॅबोरेटरीच्या माध्यमातून तपासण्या करण्यात येणार आहेत.
त्यामध्ये सिकल सेल, जन्मतः हायपोथायरॉइडिझम, रक्त तपासणी, बॅलेसेमिया आणि आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या होतील. – डाॅ. एकनाथ पवार, अधिष्ठाता – बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय
काय लाभ होणार?
आनुवंशिक आजारांवर संशोधन
कमी दरात तपासण्या
प्रसूतिपूर्वीच बाळाला होणाऱ्या आजारांचे निदान
– आनुवंशिक आजारांविषयी जनजागृती
– संशोधनातून उपचारांची दिशा




