Satara: गणेशोत्सवासाठी नगरपालिकेकडून विशेष तरतूद
Satara गणेशोत्सवासाठी सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक सुविधा आणि परवानग्या सुलभ पद्धतीने मिळाव्यात, यासाठी नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Satara: गणेशोत्सवासाठी सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक सुविधा आणि परवानग्या सुलभ पद्धतीने मिळाव्यात, यासाठी नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय समितीने केलेल्या मागण्यांची दखल घेऊन, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या संदर्भात गणेशोत्सव मंडळाच्या समन्वय समितीतर्फे नगराध्यक्षांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. यंदा 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून, मंडळांची तयारी सुरू झाली आहे. मंडळांना विविध विभागांच्या परवानग्यांसाठी करावी लागणारी धावपळ टाळण्यासाठी नगर परिषद, पोलीस, वाहतूक, अग्निशमन व महावितरण या विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबवण्याची मागणी समितीने केली आहे. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, अतिक्रमणे हटवणे, झाडांच्या धोकादायकफांद्या छाटणे, लटकणार्या विद्युत तारा व केबल सुरक्षित उंचीवर नेणे आणि मोती चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे, या मागण्याही समन्वय समितीने केल्या आहेत.
विसर्जन तलाव आणि नदीच्या घाटांची स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी आणि आवश्यक ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड उपलब्ध करून द्यावीत. माहुली येथे विसर्जनासाठी योग्य व्यवस्था करावी. गणेशमूर्तींच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सातव्या दिवसापासून क्रेन उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. गणेश मंडळांसाठी सुंदर गणेशमूर्ती व सुंदर देखावे स्पर्धा घेण्याबाबतही चर्चा झाली. उत्सवातील शेवटच्या पाच दिवसांत राजवाडा येथील चौपाटीची वेळ पहाटे 2 वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.





