विशेष : विचारांचा वारसा ते जबाबदारी
आज अण्णाभाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांच्या जन्मशतकोत्तर काळात उभे राहून पाहिले, तर त्यांच्या विचारांचा वारसा आपण कितपत जपला आणि त्या विचारांप्रती समाजाने आपली जबाबदारी कितपत पार पाडली हा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येतो.

– उज्ज्वला शिंदे
Anna Bhau Sathe : आज अण्णाभाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांच्या जन्मशतकोत्तर काळात उभे राहून पाहिले, तर त्यांच्या विचारांचा वारसा आपण कितपत जपला आणि त्या विचारांप्रती समाजाने आपली जबाबदारी कितपत पार पाडली हा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येतो.
‘पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे’, असे ठामपणे सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Anna Bhau Sathe) हे मराठी साहित्यविश्वातील एक अद्वितीय आणि युगप्रवर्तक साहित्यिक होते.
मराठी साहित्यविश्वाला वास्तवाची धग देत, समाजातील वंचित, उपेक्षित, श्रमिक घटकांना आपल्या साहित्याचा नायक बनवून त्यांनी साहित्याच्या प्रवाहाला एक नवी दिशा आणि नवी उंची दिली. त्यांनी साहित्याकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून त्याचा समर्थपणे उपयोग केला.
समाजाला वास्तवाचे भान करून देणार्या अण्णाभाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे मातंग समाजातील अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. अठराविश्व दारिद्य्रामुळे त्यांना औपचारिक शिक्षणाची संधी लाभली नाही. त्यांनी केवळ दीड दिवस शाळेचे शिक्षण घेतले; परंतु वास्तव जीवनात वाट्याला आलेला संघर्ष, कष्ट, जातीय विषमता, भूक, दारिद्य्र यांच्या अनुभवाने त्यांचे जगणे समृद्ध झाले होते.
हेच अनुभव पुढे त्यांच्या साहित्यनिर्मितीचे प्रेरणास्थान ठरले. मराठी साहित्यविश्वात अनेक विद्वान आणि उच्चशिक्षित लेखक होऊन गेले; परंतु अण्णाभाऊ साठे यांनी जे जगले जे भोगले आणि जे अनुभवले तेच आपल्या साहित्यामध्ये प्रामाणिकपणे व्यक्त केले; त्यामुळे त्यांचे साहित्य कपोलकल्पित किंवा केवळ मनोरंजनप्रधान न वाटता जीवनवादी साहित्य वाटते.
उदरनिर्वाहासाठी अण्णाभाऊ मुंबईत आले. गिरण्या, बांधकामे, हमाली अशा अनेक कष्टाच्या कामात त्यांनी आपले आयुष्य घालवले. कामगार म्हणून जगताना कामगारांच्या वेदना, संघर्ष, शोषण त्यांनी जवळून अनुभवले. या अनुभवातून त्यांचा संबंध कामगार चळवळीशी आला आणि त्यातूनच मार्क्सवादी विचारांचा त्यांच्या साहित्यावर व व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडला.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, सामाजिक न्याय या विचारांनीही त्यांना प्रेरित केले होते. या दोन विचार प्रवाहांनी भारावलेल्या अण्णाभाऊंनी सामाजिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांना आपल्या विचारांचा केंद्रबिंदू बनवले. ज्या काळात अभिजात साहित्यामध्ये प्रामुख्याने उच्चवर्गीय समाजातील नायक-नायिकांचे जीवन चित्रीत होत होते त्या काळात समाजातील उपेक्षित, वंचित घटक हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा मूळ पाया बनला. अण्णाभाऊंनी या परंपरेला धाडसाने छेद दिला.
त्यांनी झोपडपट्टीतील कामगार, शेतमजूर, भटके, दलित, स्त्रिया आणि कष्टकरी यांच्या वेदनांना आपल्या साहित्यातून शब्दबद्ध केले. त्यामुळे त्यांच्या लेखनात कृत्रिमता नव्हती; होती ती वास्तवाची धग; म्हणूनच त्यांचे साहित्य काळजाला भिडणारे आणि वाचकाला अंतर्मुख करणारे ठरले. अण्णाभाऊंनी अनेक कादंबर्या, कथासंग्रह, पोवाडे, लावण्या, नाटके आणि लोकनाट्य यांची निर्मिती केली. त्यांनी पोवाडा, लावणी, लोकनाट्य यासारख्या लोककलांचा उपयोग करून त्यांच्या विचारांना थेट सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले.
अण्णाभाऊंच्या (Anna Bhau Sathe) साहित्याने सामान्य माणसाला नायक बनविण्याचा विद्रोह केला. ज्या पद्धतीने संत तुकारामांनी आपल्या अभंगातून धर्मातील विषमता, दांभिकता आणि अन्यायावर प्रहार केला; त्या पद्धतीने अण्णाभाऊंनी समाजातील विषमता, शोषण, अन्यायाविरुद्ध साहित्यातून विद्रोह उभा केला. संघर्ष हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता.
‘फकिरा’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली कादंबरी. आजही मराठी साहित्यात मौल्यवान आहे. या कादंबरीत अन्यायाविरुद्ध लढणार्या सामान्य माणसाचा स्वाभिमान आणि संघर्ष प्रभावीपणे उभा केला आहे. त्यांच्या साहित्यातून दुःख प्रतीत होत असले तरी; त्यामध्ये आशावादही आहे. शोषण आणि अन्याय असला तरी त्या विरुद्ध लढण्याचे बळही साहित्य देते. आत्यंतिक दारिद्य्रातसुद्धा आत्मसन्मान जपण्याची शिकवणूक अण्णाभाऊंच्या साहित्याने दिली. त्यामुळे त्यांचे साहित्य आजही प्रेरणादायी वाटते.
ज्या समाजपरिवर्तनासाठी साहित्याला शस्त्र बनवून जातीय विषमता, अन्याय, शोषण यांच्या विरुद्ध बंड पुकारले त्या समस्या आजच्या समाजातून पूर्णपणे संपलेल्या नाहीत. म्हणूनच अण्णाभाऊंचे साहित्य आजही तितकेच प्रेरणादायी आणि दिशा देणारे आहे. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारित समाजपरिवर्तनाचा प्रवास आजही पूर्णत्वाला गेलेला नाही.
अण्णाभाऊंनी साहित्यातून उभी केलेली वैचारिक चळवळ विविध सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मर्यादांमुळे व्यापक होऊ शकली नाही. वास्तवात अनेकदा त्यांच्या नावाचा गौरव झाला; पण त्यांच्या विचारांचे आचरण कमी झाले. जयंती, मिरवणुका आणि स्मरण समारंभ मोठ्या उत्साहात झाले; मात्र वाचन संस्कृती, शैक्षणिक प्रगती, सामाजिक ऐक्य आणि वैचारिक चळवळ तितक्या जोमाने उभी राहिली नाही. त्यामुळे साहित्यातून अण्णाभाऊंनी दाखवलेली विचारांची उंची आणि समाजाची प्रत्यक्ष वाटचाल यामध्ये अंतर दिसून येते.
अर्थात समाजाला अण्णाभाऊंनी दाखवलेल्या वैचारिक चळवळीचा घटक बनून अपेक्षित प्रमाणात लाभ घेता आला नाही. परंतु आजही जर अण्णाभाऊंच्या साहित्याचे वाटप प्रत्येक घरापर्यंत पोहोचले, युवकांनी त्यांच्या साहित्याचे वाचन करून शिक्षण, उद्योग, स्पर्धा परीक्षा आणि नेतृत्व याकडे वाटचाल केली; तर वैचारिक क्रांती घडून आत्मविकास साधता येण्यास वाव आहे. त्यामुळे अंधानुकरणा ऐवजी विचारांच्या अनुकरणात मोठे सामर्थ्य सामावलेले आहे; म्हणून अण्णाभाऊंचा खरा सन्मान त्यांचे विचार जगण्यात आहे.
समाजाने अण्णाभाऊंच्या विचारातील स्वाभिमान, शिक्षण आणि परिवर्तनाचा वारसा प्रत्यक्ष कृतीत उतरविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आज अण्णाभाऊंच्या स्मृतिदिनी एवढेच म्हणावेसे वाटते की, अण्णाभाऊंना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात उतरवणे, त्यांच्या पुस्तकांना हातात, शिक्षणाला जीवनात आणि स्वाभिमानाला व्यक्तिमत्त्वात स्थान दिले तरच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.






