Satara News – सातारा नगरपालिकेच्या वतीने शाहू चौक येथे उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या ( शुक्रवारी) सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली. या सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान, अनावरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बुधवारी पुतळा परिसराची पाहणी केली. यावेळी पुतळा संयोजन समितीचे सदस्य किशोर गालफाडे, गणेश भिसे, नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत गोडसे, मागासवर्गीय दुर्बल कल्याण समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक संकेत साठे समिती सदस्य सचिन कांबळे, अण्णा वायदंडे, भाऊ पाटोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नगराध्यक्ष मोहिते यांनी सांगितले की, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या २५ फुटी पुतळ्याचे अनावरण हा सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा क्षण असून, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे. हा कार्यक्रम १ मे रोजी आयोजित करण्यात येणार होता; मात्र काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.