विशेष : डिजिटल शिक्षण आणि शिक्षक

– प्रा. डॉ. सुभाष राठोड
शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण विचार करताना हे लक्षात घ्यायला हवे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सुचवलेला सर्वसमावेशक, विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन साकारण्यासाठी शिक्षकच मुख्य प्रेरणास्थान आहे.
आजच्या डिजिटल युगात शिक्षकाची भूमिका अधिक व्यापक झाली आहे. तो आता केवळ अध्यापक नाही. आजचा काळ हा माहितीचा, ज्ञानसंपत्तीच्या अथांग महासागराचा काळ आहे. माहितीचा प्रवाह इतका वेगवान झाला आहे की विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाइल, टॅबलेट किंवा संगणकावर संपूर्ण जगाचा खजिना उपलब्ध झाला आहे. पारंपरिक पाटी-खडूपासून स्मार्टबोर्ड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत शिक्षण प्रवास करत असताना शिक्षकाची भूमिका केवळ माहिती देणारा इतकी मर्यादित राहिलेली नाही. तोच आता दिशादर्शक दीपस्तंभ, प्रेरणादायी मार्गदर्शक आणि डिजिटल साधनांचा सुज्ञ वापर करून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची जाण करून देणारा सर्वसमावेशक शिल्पकार ठरतो.
आज इंटरनेट, स्मार्टफोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यामुळे ज्ञानाचे दरवाजे प्रत्येकासाठी खुले झाले आहेत. विद्यार्थी एका क्लिकवर जगभरातील माहिती मिळवतात. अशा परिस्थितीत शिक्षक केवळ ‘माहिती पुरवणारा’ राहिलेला नाही; तर तो विद्यार्थ्यांना योग्य माहिती निवडण्याची, तिचा वापर करण्याची आणि ती जीवनात उतरवण्याची कला शिकवतो. ऑनलाइन क्लासेस, व्हर्च्युअल क्लासरूम्स, शैक्षणिक अॅप्स यामुळे शिक्षकांनी नवे कौशल्य आत्मसात केले.
भारतीय शिक्षणव्यवस्थेत या बदलत्या भूमिकेला अधिकृत स्वरूप देत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर झाले. या धोरणाने शिक्षणात लवचिकता, कौशल्याभिमुखता, बहुभाषिकता, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि शिक्षक हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी असणे यावर भर दिला आहे. डिजिटल साधनांचा परिणामकारक उपयोग करून विद्यार्थी ज्ञानार्जनापासून ते विचार प्रवृत्ती, नवसर्जन आणि मूल्याधारित जीवनाकडे वाटचाल करू शकतील, असा स्पष्ट संदेश या धोरणातून दिला गेला आहे. त्यासाठी शिक्षकाला फक्त ‘अध्यापक’ न मानता तो ‘फॅसिलिटेटर’, ‘मेंटर’ आणि ‘आयुष्यभर शिक्षण देणारा प्रेरक’ म्हणून मांडले गेले आहे.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी माहिती सहज मिळवतात, पण त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करून ती विवेकबुद्धी, सृजनशीलता आणि समाजाभिमुखतेशी जोडणारा दुवा म्हणजे शिक्षक. म्हणूनच त्याची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक जबाबदारीची, अधिकआव्हानात्मक आणि अधिक सृजनशील ठरते. शिक्षण म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे; तर विचार करायला शिकवणे या तत्त्वाला अनुसरून आजचा शिक्षक पारंपरिक संस्कार व आधुनिक तंत्रज्ञान यांचा सेतू बांधतो. भारतीय शिक्षण परंपरा आता डिजिटल क्रांतीच्या संगमावर उभी आहे. म्हणूनच शिक्षकाने आज फक्त खडू-फळा किंवा वर्गाच्या चार भिंतींमध्ये मर्यादित न राहता, डिजिटल माध्यमांचा, नव्या अध्यापन पद्धतींचा आणि कौशल्याधारित दृष्टिकोनाचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे.
विद्यार्थ्यांना केवळ रोजगारक्षम बनवणे नव्हे तर जबाबदार, संवेदनशील आणि सामाजिक भान असलेले नागरिक घडवणे ही शिक्षकाची खरी कसोटी आहे. आजच्या भारतात शिक्षणव्यवस्थेचा पाया भक्कम असूनही तिच्यासमोर अनेक गंभीर समस्या उभ्या आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील शिक्षणातील दरी, दर्जेदार शिक्षकांची कमतरता, अभ्यासक्रमातील कालबाह्यता, विद्यार्थ्यांवरील परीक्षा-केंद्रित ताण, डिजिटल साधनांचा असमतोल वापर तसेच खासगी शिकवणी वर्गांचा वाढता प्रभाव ही काही ठळक अडचणी आहेत.
शिक्षणाला हक्काचे स्वरूप देणार्या धोरणांनंतरही अनेक मुलं अजूनही शाळाबाह्य आहेत, तर शिकणार्यांपैकी मोठ्या संख्येला कौशल्य विकास व रोजगाराभिमुख शिक्षणाची जोड मिळत नाही. पालकांच्या अपेक्षा, शिक्षकांवरील प्रशासकीय जबाबदार्या आणि सुविधांचा अभाव यामुळे अध्यापनाची गुणवत्ता कमी होते. शिक्षण म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे, तर विचारांची दिशा देणे होय हे तत्त्व विसरल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाण आणि सृजनशीलता कमी होत आहे. या समस्या दूर करून शिक्षणाला सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण आणि वास्तवाशी निगडित करण्याची आज तातडीची गरज आहे.
आजच्या डिजिटल युगामुळे शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे. मोबाइल, इंटरनेट, ऑनलाइन क्लासेस यामुळे विद्यार्थी घरबसल्या ज्ञान घेऊ शकतात. शिकण्याच्या संधी वाढल्या आहेत, पण त्याचबरोबर काही गंभीर अडचणीही निर्माण झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणात माहिती तर खूप मिळते, पण कोणती माहिती खरी आणि कोणती खोटी हे विद्यार्थ्यांना ओळखता येत नाही. योग्य मार्गदर्शनाशिवाय ही माहिती गोंधळ निर्माण करते. तंत्रज्ञानामुळे शिकणे सोपे झाले असले तरी त्याच्यावरचा अतिविश्वास ही समस्या ठरते.
मोबाइल आणि लॅपटॉपवर अभ्यास करता करता अनेक विद्यार्थी गेम्स, सोशल मीडिया आणि मनोरंजनाकडे वळतात. यामुळे त्यांची एकाग्रता कमी होते आणि अभ्यासापेक्षा मनोरंजनाला जास्त प्राधान्य दिले जाते. डिजिटल शिक्षणामुळे शिक्षक-विद्यार्थी संवादही कमी झाला आहे. आधी गुरू-शिष्य नात्यातून केवळ ज्ञानच नाही, तर संस्कार आणि मूल्येही दिली जात होती. पण ऑनलाइन क्लासमध्ये ही ऊब हरवली आहे. स्क्रीनवरून ज्ञान मिळते, पण त्यात अनुभवांची आणि भावनिक जडणघडणीची उणीव राहते.
पायाभूत सुविधांची कमतरता हीसुद्धा मोठी अडचण आहे. शहरांमध्ये इंटरनेट आणि साधनं सहज उपलब्ध असतात, पण ग्रामीण भागातील किंवा गरीब विद्यार्थ्यांना त्यांचा अभाव भासतो. त्यामुळे ‘डिजिटल दरी’ तयार होते. काही विद्यार्थी पुढे जातात, तर काही मागे राहतात. बदलत्या काळात नवी आव्हाने समोर येत आहेत. म्हणूनच शिक्षकाने स्वतःला काळानुरूप सक्षम करणे. बदलता अभ्यासक्रम, शैक्षणिक धोरणे व जागतिक परिप्रेक्ष्याशी जुळवून घेणारा शिक्षकच विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने मार्गदर्शक होऊ शकतो.





