Pune District : सोयाबीनला पावसाची आस
Pune District : हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकाची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल, अशी शेतकर्यांची अपेक्षा होती.

चिंबळी : खेड तालुक्याच्या दक्षिण भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने अनेक ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडून गळू लागली असून, काही भागांत उभी पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. ऐन वाढीच्या आणि शेंगा धरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने यंदाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या ग्रामीण भागात, विशेषतः मोई, केळगाव, चिंबळी, कुरुळी आणि निघोजे परिसरात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकाची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल, अशी शेतकर्यांची अपेक्षा होती.
मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घ ओढ दिल्याने कडक उन्हाचा पिकाला फटका बसत आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी सोयाबीनची वाढ खुंटली असून, पाने पिवळी पडून गळत आहेत. तर काही शेतांमध्ये उभी पिके करपू लागली आहेत. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक हातातून जाण्याची भीती आहे.
पेरणी, खते, औषधे आणि कोळपणीसाठी झालेला खर्चही वसूल होणे कठीण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने पिके जोमात होती. मात्र, आता ऐन वाढीच्या आणि शेंगा धरण्याच्या काळात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन सुकत चालले आहे. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे,
-सत्यवान जैद, प्रगतिशील शेतकरी





