Test Cricket Record : कसोटी क्रिकेटमध्ये १०० वर्षांनंतर पहिल्यांदाचं असं घडलं! द.आफ्रिका-ऑस्ट्रेलिया सामन्यात नोंदवला गेला ऐतिहासिक विक्रम
Test Cricket Record : गकेबरहा येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात १०० वर्षांतील एक दुर्मिळ विक्रम नोंदवला गेला, ज्यात दोन्ही संघांमधील खेळाडूंचा समावेश आहे.

South Africa vs Australia Second Test Sees 19 Players Aged 30 Plus Unique Record After 100 Years : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क मैदानावर सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या नाणेफेकीसह पुरुषांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तब्बल १०० वर्षांनंतर एका अत्यंत अनोख्या आणि ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. या लढतीत दोन्ही संघांचे मिळून तब्बल १९ खेळाडू ३० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. १९२६ नंतर कसोटी इतिहासात मैदानात इतके अनुभवी खेळाडू एकाच वेळी खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम ३० पार; इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम –
ऑस्ट्रेलियाच्या अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही खेळाडू ३० वर्षांपेक्षा कमी वयाचा नाही. ऑस्ट्रेलियन संघात सर्वात लहान मॅट रेनशॉ ३० वर्षांचा असून, स्टीव्ह स्मिथ आणि स्कॉट बोलँड ३७ वर्षांचे आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघातही तब्बल ८ खेळाडू ३० वर्षांच्या पुढील आहेत; केवळ मॅथ्यू ब्रिट्झके, मार्को यान्सन आणि वियान मुल्डर हे तिघेच ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३० प्लस खेळाडू खेळण्याचा सर्वकालीन विक्रम १९२६ मध्ये नॉटिंगहॅम येथे इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामन्यात नोंदवला गेला होता, जिथे तब्बल २० खेळाडू ३० पार होते.
दोन्ही संघांत महत्त्वपूर्ण बदल; स्कॉट बोलँड आणि रबाडाची एन्ट्री –
Most players aged 30 or more in a men’s Test match:
20 – ENG vs AUS at Nottingham, 1926
19 – AUS vs ENG at Sydney, 1921
19 – ENG vs AUS at Lord’s, 1926
19 – ENG vs AUS at Leeds, 1926
19 – ENG vs AUS at Manchester, 1926
𝟭𝟵 – 𝗦𝗔 𝘃𝘀 𝗔𝗨𝗦 𝗮𝘁 𝗚𝗾𝗲𝗯𝗲𝗿𝗵𝗮, 𝗧𝗵𝗶𝘀 𝗠.. https://t.co/nhxZ8f2sTV— OK Cricket (@okcricket14) October 18, 2026
संघांमधील बदलांविषयी बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने फिरकीपटू नॅथन लायनच्या जागी वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडला संघात स्थान दिले आहे. तर तीन सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने तीन मोठे बदल केले आहेत. यजमान संघात स्टार गोलंदाज कगिसो रबाडाचे पुनरागमन झाले असून, मार्कस एकरमनला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे, तर मॅथ्यू ब्रिट्झकेला एका वर्षानंतर संघात पुन्हा पाचारण करण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी मालिका वाचवण्यासाठी ‘करो या मरो’ लढत –
डर्बन येथील पहिल्या कसोटीत २१४ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेसाठी ही कसोटी अत्यंत निर्णायक आहे. मालिका बरोबरीत आणण्यासाठी यजमानांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे १०० वर्षांनंतर घडलेल्या या ऐतिहासिक विक्रमाच्या साक्षीने दोन्ही संघांतील अनुभवी खेळाडूंमध्ये मैदानावर जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.





