Sourav Ganguly : सौरव गांगुलीचे दमदार पुनरागमन, पुन्हा अध्यक्षपदी विराजमान; पदभार स्वीकारताच केली मोठी घोषणा

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (CAB) अध्यक्षपदी पुन्हा एकदा निर्विरोध निवड झाली आहे. सहा वर्षांनंतर दादा पुन्हा CAB च्या अध्यक्षपदावर विराजमान झाला असून, त्याने आपला मोठा भाऊ स्नेहशीष गांगुली याला रिप्लेस केले आहे.
२३ सप्टेंबर रोजी कोलकात्यात झालेल्या CAB च्या ९४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गांगुलीने २०१५ ते २०१९ या कालावधीत CAB चे अध्यक्षपद सांभाळले होते आणि २०१९ ते २०२२ दरम्यान बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.
गांगुलीच्या पॅनेलची बिनविरोध निवड
सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनेलचीही बिनविरोध निवड झाली. यामध्ये बबलू कोले (सचिव), मदन मोहन घोष (सहसचिव), संजय दास (कोषाध्यक्ष) आणि अनु दत्ता (उपाध्यक्ष) यांचा समावेश आहे. सध्या गांगुली दक्षिण आफ्रिकेच्या SA20 टी-20 लीगमधील प्रिटोरिया कॅपिटल्सचा प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहे.
CAB चा अध्यक्ष म्हणून गांगुलीसमोरील पहिली मोठी जबाबदारी आहे, ईडन गार्डन्स स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाखांपर्यंत वाढवणे आणि पुढील वर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचे सामने मिळवणे. येत्या १४ नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याचे आयोजन ईडन गार्डन्सवर होणार आहे. २०१९ मध्ये गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या काळात सुरू झालेल्या ऐतिहासिक डे-नाईट पिंक बॉल टेस्टनंतर हा स्टेडियमवरील पहिला टेस्ट सामना असेल.
पदभार स्वीकारताच केली मोठी घोषणा
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सौरव गांगुलीने सांगितले, “भारत-दक्षिण आफ्रिका टेस्ट सामना खूपच रोमांचक असेल. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आहे, आणि ईडन गार्डन्सच्या सुविधा उत्तम आहेत. फक्त आयोजन योग्य पद्धतीने करावे लागेल. दोन्ही संघ बलाढ्य असल्याने हा एक उत्कृष्ट सामना ठरेल याची मला खात्री आहे.”





