लवकरच होणार वरुण-नताशा नवीन घरात शिफ्ट

मुंबई – बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. अलिबाग येथील एका अलिशान रिसॉर्टमध्ये 24 जानेवारी रोजी त्यांचा लग्न सोहळा पार पडला. लग्नानंतर वरुण आणि नताशा त्यांच्या कुटुंबीयांसोबतच राहत होते. मात्र लवकरच आता दोघेही त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत.
वरुणने लग्नाच्या अगोदर 2017 मध्ये एक अलिशान घर खरेदी केले होते. वरुण आणि नताशा यांच्या लग्नानंतर आता त्यांच्या अलिशान घराचा व्हिडिओ समोर आला आहे. बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नानंतर अनुपम खेर यांनी शूट केलेला एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.
वरुणच्या घराचा जेव्हा गृहप्रवेश झाला होता, त्यावेळी अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले की, वरुण धवनने त्याचे नवीन घर दाखवले. त्याला मी लहानपणापासून ओळखतो, जेव्हा त्याचे वडील वेस्पा स्कुटरवर फिरायचे. त्यांच्या कष्टाचे मोल झाले आहे. वरुणची आई लाली धवन यांनी घरातील इंटीरियर डेकोरेट केले असल्याचे खेर म्हणाले.





