sonakshi sinha: बॉडी शेमिंगवर सोनाक्षी सिन्हाची स्पष्ट प्रतिक्रिया; म्हणाली, “मी आत्मविश्वासू आहे आणि त्याबद्दल मला कमीपणा वाटत नाही”

sonakshi sinha : बॉडी शेमिंग म्हणजे व्यक्तीच्या शरीराच्या आकारावर, वजनावर किंवा दिसण्यावरून केलेली टीका. सोशल मीडियाच्या युगात हा विषय अधिकच चर्चेत राहतो आणि बॉलिवूड सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, जिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या वजनावरून होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मोकळेपणाने बोलली आहे.
रणवीर अल्लाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली,
“शाळेपासूनच माझ्या वजन आणि लूक्सवरून लोक बोलतात. आजही तसं होतं, पण आता मी त्याकडे दुर्लक्ष करते. लग्नानंतर तर या चर्चा आणखी वाढल्या आहेत. अनेकांना वाटतं की मी प्रेग्नंट आहे किंवा मला काम करायचंच नाही. लोक असं का विचार करतात, हे मला कळत नाही.”
ती पुढे म्हणाली,
“लहानपणी मला ‘गोलू’ आणि ‘मोटू’ म्हणून चिडवलं जायचं. पण आता त्याचं मला काही वाटत नाही. मी अशा क्षेत्रात आहे जिथे स्त्रियांच्या शरीरावर टिप्पणी केली जाते, पण मी त्याच विषयावर चित्रपट करते, त्यामुळे मला वाटतं मी यासाठीच बनले आहे.”
आत्मविश्वास आणि स्वतःवर विश्वास.
सोनाक्षीने सांगितलं की, “माझं वजन जास्त असूनही मला त्याबद्दल कधीच कमीपणा वाटला नाही. मी लहानपणापासून आत्मविश्वासू आहे. कधी वाटलं नव्हतं की, मी अशा क्षेत्रात येईन जिथे बाह्य रूप आणि सौंदर्य इतकं महत्त्वाचं असेल. पण तरीही मी माझ्या पद्धतीनं इथे स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.”
लग्नानंतरच्या ट्रोलिंगबद्दल,
सोनाक्षीने 23 जून 2024 रोजी अभिनेता झहीर इक्बालशी लग्न केलं. लग्नानंतर तिच्या वजनावर आणि वैवाहिक जीवनावरही ट्रोलिंग झाल. हिंदू-मुस्लीम विवाहामुळे काही लोकांनी दोघांवर टीका केली, मात्र सोनाक्षीने त्याकडे दुर्लक्ष करत सकारात्मक राहणं पसंत केलं.
सोशल मीडियावर सक्रिय
सोनाक्षी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती झहीरसोबतचे अनेक मजेशीर व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. तिच्या पोस्ट्सला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसादही मिळतो.
सोनाक्षी सिन्हाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन असेल, तर ट्रोलिंगसारख्या नकारात्मक गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही. ती आजच्या तरुणींना स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःच्या रूपावर अभिमान बाळगायला प्रेरणा देते.





