Soha Ali khan Birthday: बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाबरोबरच ती शिक्षण आणि इतर क्षेत्रांतही पुढे आहे. चला तर मग, तिच्या खास दिवशी जाणून घेऊया बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी ती काय करत होती. सोहा अली खानचा जन्म ४ ऑक्टोबर १९७८ रोजी झाला. ती सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर आणि माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी यांची मुलगी आहे. अभिनेता सैफ अली खान हिचा मोठा भाऊ आहे. सोहाने हिंदीसोबतच इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. रंग दे बसंती, तुम मिले या तिच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी काही आहेत. तिने २००४ मध्ये दिल मांगे मोर या चित्रपटातून शाहिद कपूरसमवेत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनय क्षेत्रात येण्याआधी सोहाने उच्च शिक्षण पूर्ण केले. तिने नवी दिल्लीतील द ब्रिटिश स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातील बॅलिओल कॉलेजमध्ये मॉडर्न हिस्ट्रीचे शिक्षण घेतले. यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये मास्टर्सची पदवी मिळवली. सोहाने करिअरची सुरुवात फोर्ड फेडरेशन आणि सिटी बँकमध्ये नोकरी करून केली. त्यानंतर आई आणि भावाप्रमाणेच अभिनय क्षेत्र निवडले. २०१७ मध्ये तिने ‘द पेरिल्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस’ हे पुस्तक लिहिले. सोहा फिटनेसची विशेष काळजी घेते आणि आरोग्यदायी जीवनशैली पाळते. ती नेहमी योगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. २५ जानेवारी २०१५ रोजी सोहाने अभिनेता कुणाल खेमूशी विवाह केला. त्यांना इनाया नौमी खेमू नावाची एक मुलगी आहे.