पुणे जिल्हा | शेतमजुराचा मुलगा पीएसआय क्लास, मार्गदर्शन नसताना यशाला गवसणी

यवत, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या सूरज प्रकाश झाडगे याने कष्ट, जिद्द आणि चिकाटी अंगी असली की, यश हमखास मिळते. हे दाखवून दिले आहे. शेतमजुराचा मुलगा सूरज याने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून खाकी वर्दीला गवसणी घातली आहे. गावात सुरजची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सूरज याचे वडील प्रकाश झाडगे यांचे ४ थी शिक्षण झालेले आहे. आईचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. दोघेही घरची थोडीफार शेती आणि दुसऱ्यांच्या शेतात मजुरी काम करतात. याच कष्टातून त्यांनी आम्हाला चांगले शिक्षण देऊन इथपर्यंत पोहचविले असल्याचे मत सूरज याने दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केले.
सूरजने त्यांचे बालपणीचे पहिले ते चौथीचे शिक्षण ज़िल्हा परिषद शाळा एरिगेशन ऑफिस, नाथाचीवाडी येथे घेतले त्याने माध्यमिक शिक्षण व १२वी खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयात पूर्ण केले. शिक्षणाची आवड असणाऱ्या सूरज याने पुढील शिक्षणासाठी पुण्याची वाट धरली. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये त्याने बीएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात गेल्यानंतर सूरज याने स्पर्धा परीक्षेबद्दल ऐकले होते. झुलॉजीमधून बीएससी पूर्ण करून स्पर्धा परीक्षाच्या अभ्यासाची तयारी केली.
मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने सूरज याने नांदूर येथील फिल्डगार्ड कंपनीमध्ये नोकरी करून आपल्याला कुटुंबाला हातभार लावण्यास सुरवात केली. मात्र, फौजदार बनन्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याची त्याची जिद्द होती. त्याने घरीच अभ्यास सुरु केला होता. त्याने केडगाव येथील सरस्वती अभ्यासिकेत देखील अभ्यास चालू ठेवला.
कोणताही खासगी क्लास नसताना कोणाचेही मार्गदर्शन नसताना आई- वडिलांचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याच्या चिकाटीने त्याने पहिल्याच प्रयत्नात फौजदार पदाला गवसणी घातली. सूरज याचा लहान भाऊ हा देखील पुणे पीपल्स बँकेत नोकरी करीत आहे. सूरज याची फौजदार म्हणून निवड झाल्याची समजताच कसबा मतदार संघांचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील सूरज याचा सन्मान केला.
पालकांच्या कष्टाचे चीज
सूरज याने आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले. आपण अल्पशिक्षित होतो. मात्र मुलांना त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने शिक्षण देऊन आपली शिक्षणाची कसर भरून काढली, अशी प्रतिक्रिया आई वडिलांनी व्यक्त केली.





