Pune News | पुण्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएसीच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यामध्ये प्रामुख्याने परीक्षेची तारीख ४५ दिवसांनी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच PSI/STI पदवाढीची मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालातील गोंधळ तसेच प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळवूनही गुणवत्तायादीत स्थान न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्वरुपाची नाराजी आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलावी आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. १ डिसेंबर २०२४ रोजी राज्यसेवा परीक्षा पार पडली. १२ मार्च रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिदृष्ट्या मागास प्रवर्गाचे एसईबीसी आरक्षण लागू असतानाही काही मराठा विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्लूएस यादीत समाविष्ठ करण्यात आले. यामुळे मूळ ‘ईडब्ल्यूएस’ प्रर्वगातील अनेक विद्यार्थ्यी अपात्र ठरले. परिणामी त्यांना मुख्य परीक्षा देता आली नाही. यासाठी या आंदोलनलाला विद्यार्थ्यांनी आजपासून सुरूवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात आंदोलन आज सकाळीच छत्रपती संभाजनगरमधील क्रांती चौकात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यी एकवटले होते. एमपीएससीच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. PSI/STI सह विविध भरती प्रक्रियेमधील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्य़ानी दिला.